बुलढाणा: ११ नगरपालिकांच्या रणसंग्राम निमित्त शहरी भागातील वातावरण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही वेगळे चित्र आहे असे नाही. उलट जिल्हापरिषद व १३ पंचायत समित्याच्या निवडणुकाचा मुहूर्त घोषित होण्यापूर्वीच ग्रामीण भागातील वातावरण कमालीचे तापले आहे.
सध्या ११ पालिकांच्या निवडणुकीची लढत रंगली आहे. एकूण १४५ प्रभाग मधील २४६ सदस्य पदासाठी ही लढत रंगली आहे. मात्र ७. ७६ लाख मतदार पैकी राजकारणी, कार्यकर्ते व कट्टर राजकारण प्रेमी वगळले तर लाखो मतदार लढतीबद्धल उदासीनच असल्याचे चित्र आहे.
याउलट जिल्ह्यातील १४०० गावातील चित्र आहे. घरी दारी, ‘चाय पे’, रब्बी च्या धामधूमीत शेतात आणि रात्री पेटणाऱ्या शेकोट्या भोवती जमलेल्या मध्ये झेडपी अन पंचायत समिती निवडणूक, पॅनेल, ताई- भाऊ हाच चर्चेचा विषय आहे. जिल्हा परिषदेच्या ६१ तर १३ पंचायत समित्याच्या १२२ जागासाठी लवकरच रणसंग्राम रंगणार आहे. मागील मार्च २०२१ मध्ये जिल्हा परिषदेची मुदत संपल्यावर मागील चार वर्षांपासून जिल्हा परिषदेत प्रशासक राज आहे.
यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीनिमित्त ग्रामीण भागातील राजकीय वर्तुळात उत्साह ओसांडून वाहत आहे. ग्राम पंचायती, कार्यकारी सोसायट्या, बाजार समित्या लढतीत हाच उत्साह दिसून येतो. उत्साही मतदानची नोंद होते. त्यामुळे जिल्हा परिषद लढती साठी उत्साह अन राजकीय वातावरण तापणे यात नवल काहीच नाही.
जिल्हा परिषदेसाठीची मतदार यादी नुकतेच प्रसिद्ध करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मतदारांची संख्या १६ लाख, ६५ हजार ३४३ इतकी आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ८ लाख ६३ हजार ६५२ इतकी आहे. महिला मतदारांची संख्याही निर्नायक म्हणजे ८ लाख १हजार १६१ इतकी आहे. बुलढाणा तालुक्यातील मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे २ लाख ६३३ इतकी आहे. त्याखालोखाल चिखली तालुक्यात १९३१५८, खामगाव १७९४०४, मेहकर तालुक्यात १७५३८० इतकी आहे.
घाटावर जास्त मतदारसंघ
दरम्यान जिल्ह्यातील घाटाखालील भागाच्या तुलनेत घाटावरील भागात जास्त मतदारसंघ आहे. घाटावरील सहा तालुक्यात ३२ जिल्हापरिषद मतदारसंघ आहे. या तुलनेत घाटाखालील सात तालुक्यात मिळून २९ मतदारसंघ आहे. यामुळे राजकीय पक्ष, नेत्यांना घाटावर जास्त लक्ष घालावे लागणार आहे. मिनी मंत्रालयाची सत्ता काबीज करण्यासाठी आघाडी व युतीला एकेक जागा महत्वाची आहे. यामुळे मागील चारेक महिन्यापासून ग्रामीण भागात निवडणुकीचे वातावरण आहे. ग्रामीण मतदारांना आता लढतीच्या मुहूर्ताची आतुर प्रतीक्षा आहे.
