नाशिक : राष्ट्रवादीने (अजित पवार) ३८ जागांवरील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली खरी, मात्र त्यामध्ये नाशिकमधील निफाड मतदारसंघाचा समावेश नसल्याने पक्षाचे आमदार दिलीप बनकर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजप पदाधिकारी यतीन कदम यांनी अजित पवार यांची भेट घेऊन आपल्या पक्षाकडून उमेदवारी द्यावी अथवा भाजपला ही जागा सोडावी, असा आग्रह धरला आहे. निफाडची उमेदवारी गुलदस्त्यात असल्याने महायुतीत या जागेबाबत तडजोड घडू शकते, असा अंदाज बांधला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेप्रमाणे (एकनाथ शिंदे) राष्ट्रवादीने आमदारांना पुन्हा संधी देण्याचा मार्ग स्वीकारला आहे. पक्षाने यादी जाहीर करण्याआधीपासून एबी अर्ज देण्यास सुरुवात केली. त्याअंतर्गत येवल्यातून छगन भुजबळ, दिंडोरीत नरहरी झिरवळ, कळवण-सुरगाण्यातून नितीन पवार, इगतपुरीत हिरामण खोसकर यांनी एबी अर्ज वितरित केले होते. बुधवारी पक्षाने राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात उपरोक्त मतदारसंघांसह सिन्नरमधून माणिक कोकाटे, देवळालीतून सरोज अहिरे यांना उमेदवारी दिली आहे. परंतु, यामध्ये निफाडचे आमदार दिलीप बनकर यांचा समावेश नाही. बनकर हे अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पहाटेच्या शपथविधीसह महायुतीत सहभागी होताना ते आघाडीवर होते. सर्व आमदारांना उमेदवारी दिली असताना बनकर यांना मात्र प्रतिक्षेत ठेवले आहे. उमेदवारीबाबत काही अडचण नाही. यादीत नाव नक्की येईल आणि एबी अर्जही मिळेल, असा विश्वास खुद्द बनकर यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा… बंडात साथ देणाऱ्यांना संधी; शिवसेनेची दादा भुसे, सुहास कांदे यांना उमेदवारी

हे ही वाचा… धुळे: अबब…१६ तलवारी, ६ बंदुका, ८ जिवंत काडतुसे आणि…

पक्षाने निफाड वगळता जिल्ह्यातील सर्व आमदारांना तिकीट दिले. बनकर यांचे नाव पहिल्या यादीत नाही. याबाबत भाजपचे पदाधिकारी यतीन कदम यांनी वेगळाच दावा केला. महायुतीत निफाडची जागा अजित पवार गटाला सुटल्याने आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार अजितदादांची भेट घेऊन आपण इच्छुक असल्याचे सांगितले. या जागेवर कोणाला तिकीट द्यायचे, याविषयी निर्णय झालेला नाही. कोणाला एबी अर्ज दिला गेलेला नसल्याचे त्यांनी सूचित केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar group keep the suspense about niphad assembly constituency asj