नाशिक – महिंद्रा ॲण्ड महिंद्रा उद्योग समुहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी बागलाण तालुक्यातील उत्तुंग डोंगरावरील श्रीक्षेत्र मांगीतुंगी येथील गिर्यारोहणाचा अनुभव समाजमाध्यमांवर कथन केला आहे. नाशिकमध्ये प्रदीर्घ काळापासून महिंद्रा कंपनीचा वाहन प्रकल्प आहे. या ठिकाणी अनेकदा येणे-जाणे होते. परंतु, या अविस्मरणीय स्थळाबाबत आजतागायत आपणांस माहितीच नव्हती, हे देखील त्यांनी प्रांजळपणे मान्य केले.
बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी परिसराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. मांगीतुंगीच्या डोंगरात मध्यावर भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंच पूर्णाकृती मूर्ती साकारलेली आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये या भव्य मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा व मस्ताभिषेक सोहळा झाला होता. सुमारे दीड दशकांच्या प्रयत्नातून साकारलेली अखंड पाषाणातील ही एकमेव मूर्ती असल्याचे सांगितले जाते.
अहिंसेचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी पायथ्यापासून डोंगराच्या विशिष्ट भागापर्यंत ट्रस्टने खास वाहनांची व्यवस्था केलेली आहे. मूर्ती स्थळापासून मांगी व तुंगी म्हणजे आखणी वर जाण्यासाठी सुमारे दोन हजार पायऱ्या चढाव्या लागतात. काही भाविक पायथ्यापासून मूर्तीपर्यंत थेट पायी जाणे पसंत करतात. त्यांना साधारणत १६०० पायऱ्या चढाव्या लागतात, अशी माहिती व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
जैन धर्मियांच्या मांगीतुंगी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी काही वर्षांपूर्वी राज्य शासनाने २७५ कोटींचा बृहत आराखडा तयार करून कोट्यवधींची विकास कामे पूर्णत्वास नेली. नऊ वर्षांपूर्वी मांगीतुंगीच्या पायथ्याशी झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे व दादा भुसे आदींनी आवर्जुन हजेरी लावली होती. तेव्हा घाट मार्गाचा विकास आणि काही कामे प्रगतीपथावर असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव डोंगरात साकारलेल्या भगवान ऋषभदेव यांच्या भव्य मूर्तीचे अमित शहा आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांनाही प्रत्यक्ष तिथे जाऊन दर्शन घेता आले नव्हते. उभयतांना हेलिकॉप्टरमधून हवाई दर्शन घेण्यावर समाधान मानावे लागले होते.
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मांगीतुंगीच्या विहंगम दृश्यांच्या चित्रफितीसह जो अनुभव मांडला, तो प्रत्यक्ष भेटीचा होता की नाही, याची स्पष्टता मात्र झालेली नाही. ट्रस्टचे विश्वस्त भूषण कासलीवाल यांनीही त्यांच्या भेटीला दुजोरा दिला नाही.
आनंद महिंद्रा काय म्हणाले…
महिंद्रा ॲण्ड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी उत्तुंग डोंगरावरील मांगीतुंगीचा अनुभव समाजमाध्यमावर कथन केला. ‘नाशिकमध्ये महिंद्राचा मोठा प्रकल्प आहे. अनेकदा तिथे जाणे-येणे होते. तरिही बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी डोंगरावरील गिर्यारोहणाविषयी आपणांस कल्पना नव्हती. अशा अविस्मरणीय स्थळाचा आपण कधी विचारही केला नव्हता. या ठिकाणी भेट देणे म्हणजे केवळ गिरीभ्रमण नव्हे, तर आत्मिक समाधान व भावपूर्ण अनुभव देणारी प्राचीन दगडात कोरलेली १०८ फूट उंच अहिंसेची मूर्ती पाहण्याची संधी मिळते. अविश्वसनीय प्रवासाची अनुभूती देणारे स्थळे आपल्या अगदी दाराशीच आहेत,’ असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.
सोबत एका घटनेचा दाखला देत महिंद्रा यांनी सावधगिरी बाळगण्याची सूचना दिली. अलिकडेच एका कुटुंबातील काही सदस्यांना पायऱ्यांवरून मार्गक्रमण करताना अपघात झाला होता. त्यामुळे दक्षता घेण्याचा सल्ला देखील महिंद्रा यांनी दिला आहे.