जळगाव : जिल्ह्यात नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून केळीचे दर ८०० ते ९०० रूपयांनी घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. मात्र, दसरा सणामुळे मागणीत अचानक वाढ झाल्याने केळीच्या दरात गेल्या दोन दिवसात चांगली सुधारणा झाल्याचे चित्र आहे.
रक्षाबंधनाच्या अगोदर केळीचे दर तब्बल दोन हजार रुपयांवर गेले होते. मात्र, त्यानंतर व्यापाऱ्यांनी दर कमी करून ते सुमारे ११०० रुपयांपर्यंत खाली आणले. त्या मागील कारण म्हणून सततचा पाऊस आणि त्यामुळे विस्कळीत झालेली उत्तर भारतातील वाहतूक व्यवस्था व्यापाऱ्यांकडून सांगितली जात होती. परंतु, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाळी वातावरण निवळले आणि राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि पंजाब या राज्यातील केळी वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, नवरात्रोत्सव जवळ आल्याने केळीच्या मागणीत पुन्हा वाढ झाली. या घडामोडींमुळे ११५१ रुपयांपर्यंत खाली आलेले दर १७ सप्टेंबर रोजी १८५१ रुपयांच्या कमाल पातळीवर पोहोचले. परिणामी, दर घसरणीमुळे मोठे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळाला.
मात्र, नवरात्रोत्सवातील वाढती मागणी लक्षात घेऊन खरेदीसाठी पुढे आलेल्या व्यापाऱ्यांची संख्या कमी होताच गेल्या आठवड्यात पुन्हा केळीचे दर खालावल्याचे दिसून आले. बऱ्हाणपूर बाजार समितीत आठच दिवसात जवळपास ९०० रूपयांनी दर कमी झाले. नवरात्रीच्या उपवासामुळे केळीला बाजारात बऱ्यापैकी मागणी असतानाही दर घसरल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. मात्र, दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर अचानक केळीची मागणी वाढल्याने दोन दिवसांपूर्वी ६९० ते ७८२ रूपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आलेले दर बुधवारी १२०६ ते १४०० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले. दोनच दिवसात किमान दरात ५१६ आणि कमाल दरात ६१९ रूपयांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. आता हे दर कायम राहतात की आणखी खालावतात, याकडे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
केळीदर प्रश्नी जळगाव आणि बऱ्हाणपूर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक काही दिवसांपूर्वी झाली होती. त्यात केळी लिलाव प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवण्यासह लिलावांचे यूट्यूब लिंकद्वारे थेट प्रसारण करण्याचे ठरले होते. तसेच बोर्ड भाव जाहीर करताना कमीत कमी २० केळी भाव किमतींची सरासरी काढून भाव जाहीर करण्याचे आणि बाजार समिती बाहेर होणाऱ्या अनधिकृत खरेदी-विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी चेक पोस्ट स्थापन करण्याचे ठरले होते. प्रत्यक्षात, त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक केळी उत्पादन घेतले जात असले, तरी दर बऱ्हाणपुरात ठरविले जातात. त्याऐवजी रावेर तालुक्यात सावदा येथे लिलाव पद्धतीने केळीचे दर ठरविण्यात यावे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.