जळगाव : जिल्ह्यात सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच केळी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दुसरीकडे, केळीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळल्यामुळे संबंधित सर्व शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे भाव वाढतील तरी केव्हा, असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडला आहे. जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर तसेच परिसरातील इतर तालुक्यांमधील मृग बाग केळीची काढणी आता जवळपास पूर्ण झाली आहे. सध्या चोपडा, जामनेर, एरंडोल आणि जळगाव तालुक्यातील कांदेबाग केळीची काढणी सुरू झाली आहे. अर्थात,बाजारात केळीची आवक तुलनेने खूपच कमी दिसून येत आहे.
महिनाभरापूर्वी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीत दररोज सुमारे २०० ते २२० ट्रक (प्रत्येकी १० टन क्षमतेचे) केळीची आवक सुरू होती, त्या ठिकाणी आजच्या घडीला जेमतेम ५० ते ५५ ट्रक केळीची आवक होत आहे. अशी परिस्थिती कमी अधिक फरकाने रावेर तालुक्यातही दिसून येत आहे. संपूर्ण खान्देशातून जेमतेम ७५ ते ८० ट्रक केळीची आवक दररोज होत आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक केळी लागवड होणाऱ्या पट्ट्यात यंदा एप्रिलपासूनच गारपिटीसह अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या नैसर्गिक आपत्तीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही अतिवृष्टीसह पुराच्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या केळी बाग पाण्याखाली गेल्या होत्या. मोठ्या कष्टाने जगवलेल्या केळी बागांचे अतोनात नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे झाल्यानंतर उत्पादनावरही त्याचा विपरीत परिणाम आता झाला आहे. दुसरीकडे, सततच्या ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने दर्जेदार केळीचे बरेच उत्पादन यंदा घटले आहे. अनेक ठिकाणी बागेतच केळी पिकण्यास सुरूवात झाली आहे, अशा स्थितीत बाजारात मागणीच्या तुलनेत खूपच कमी केळी विक्रीसाठी येत आहे.
रावेर बाजार समितीत केळीला सध्या किमान ६०० आणि कमाल ८०० रूपये प्रति क्विंटलचा भाव आहे. तर मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजार समितीत ५०१ ते ६५१ रूपये प्रति क्विंटलचा निच्चांकी भाव दर्जेदार केळीला मिळत आहे. अपवादात्मक परिस्थितीत निर्यातीच्या केळीला बऱ्यापैकी म्हणजे ८०० ते १००० रूपयांचा भाव व्यापारी देताना दिसत आहेत. अर्थात, केळी निर्यातीचे प्रमाण खूपच नगण्य आहे. नैसर्गिक आपत्तीच्या संकटांना तोंड देऊन उत्पादन घेणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शहरांमध्ये डझनाला ३० ते ४० रुपये दराने केळी विकली जात असताना, शेतकऱ्यांकडून व्यापारी अत्यल्प दराने खरेदी करताना दिसत आहेत.
भावात सुधारणा होण्याची चिन्हे ?
जळगावमधील शेतकरी मार्च ते जुलै या कालावधीत मृगबाग प्रकारातील केळी, तर ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या कालावधीत कांदेबाग प्रकारातील केळी लागवड करतात. पैकी कांदेबाग केळीची काढणी आता सुरू आहे. मार्च-एप्रिलमध्ये लागवड झालेली नवती केळी साधारण उन्हाळ्याच्या सुरूवातीला काढणीसाठी तयार होईल. नवती प्रकारातील केळीची आवक तेव्हापासूनच बाजारात वाढेल आणि पुढे जून-जुलैपर्यंत केळीच्या आवकेत सातत्य राहील. उन्हाळा ऋतू सुरू झाल्यावर आकाश निरभ्र होऊन बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊ शकेल. आंबा वगळता इतर मोसमी फळांची स्पर्धा कमी झाल्याने त्या काळात केळीची मागणी वाढून दरात सुधारणा होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
