नाशिक : नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमध्ये कुंभमेळ्यातील हजारो कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन केले जाणार आहे. या निमित्त ठक्कर डोम येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा होईल. याद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शन करीत वातावरण निर्मिती करण्याची तयारी भाजपने केली आहे.

भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेत सभा यशस्वी करण्यासाठी तयारीला लागण्याची सूचना केली. नगर परिषद व नगर पंचायतीचे मतदान वा निकालाआधी पुढील आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेत भाजपने स्थानिक पातळीवर मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या इमारतीचे उद्घाटन आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हाती घेण्यात आलेले राम काल पथ, हजारो कोटींची रस्ते व इतर प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात भगूर, मनमाड, नांदगाव, सटाणा, सिन्नर, येवला, चांदवड, इगतपुरी, ओझऱ, पिंपळगाव बसवंत आणि त्र्यंबकेश्वर या ११ नगर परिषदा आणि नगर पंंचायतींच्या निवडणुका होत आहेत. जाहीर सभेला शहर व ग्रामीण भागातून २० ते २५ हजार लोक येतील, असे मंत्री महाजन यांनी म्हटले आहे. या माध्यमातून भाजप एकप्रकारे प्रचाराचा नारळ फोडणार आहे. परंतु, त्यास महाजन यांनी नकार दिला. आम्हाला नारळ फोडायचा असता तर त्या क्षेत्रात जाऊन फोडला जाईल. हा कार्यक्रम महानगरपालिका क्षेत्रात म्हणजे शहरात होत आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीचा संबंध नाही. या कार्यक्रमावर आचारसंहितेचाही अडसर येणार नाही. निवडणूक आचारसंहितेच्या नियमानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे महाजन यांनी नमूद केले.

नाशिक-त्र्यंबकेश्वरसाठी २५ हजार कोटींचे आराखडा तयार करण्यात आला आहे. अधिक कालावधी लागणाऱ्या विकास कामांसाठी राज्य सरकारने सुमारे आठ हजार कोटींचा निधी कुंभमेळा प्राधिकरणाच्या स्वाधीन केला आहे. हिंदू धर्मियांच्या सर्वात महत्वाच्या उत्सवात आपला प्रभाव राखण्यासाठी सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटात चढाओढ सुरू होती. त्याची परिणती पालकमंत्रीपदाचा निर्णय अनिर्णित राहण्यात झाली. कुंभमेळ्यातील हजारो कोटींची कामे निवडणूक प्रचारात महत्वाचा मुद्दा ठरू शकतो. या अनुषंगाने भाजपने तयारीला वेग दिला आहे.