धुळे : पहिला विवाह झाला असताना खोटे आधार कार्ड आणि दाखला तयार करुन दुसरा विवाह करणारी नववधू सोने, मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन सासरहून पसार झाली. या प्रकरणात सासरकडील मंडळींची सहा लाख ८३ हजार रुपयांना फसवणूक झाल्याचे उघड झाले. सात जणांविरुद्ध नरडाणा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मुली मिळत नसल्याने मुलांचे लग्न होत नसल्याचा गैरफायदा काही मंडळींकडून उठविण्यात येत आहे. एखाद्या युवकाला लग्नाचे आमिष दाखवित, पैसे घेऊन साध्या पध्दतीने लग्न लावून द्यायचे. आणि लग्नानंतर नववधूने दागिने, पैसे घेऊन पळून जायचे, असे प्रकार वाढीस लागले आहेत. असाच एक प्रकार धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील वारुळ या गावी घडला. यासंदर्भात हुकुमचंद भदाणे (३४, रा. वारूळ, शिंदखेडा, धुळे) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार नऊ जून ते २० जुलै या कालावधीत वारुळ येथे ही घटना घडली.

विलास दोरीक आणि संगीता दोरीक (दोन्ही रा.वारूळस.शिंदखेडा), मध्यस्थी असलेले मनीष पवार, नववधू प्रतीक्षा लहाने, ज्योती लहाने, नयना राठोड आणि शोभा राठोड (सर्व रा.अकोला) या सात जणांनी संगनमत करून हुकुमचंद भदाणे यांना लग्नाचे आमिष दाखवले. लग्नासाठी हुकुमचंद भदाणे आणि अन्य एकाकडून प्रत्येकी दोन लाख २७ हजार असे एकूण पाच लाख ४० हजार रुपये घेण्यात आले. ठरल्यानुसार हुकुमचंद यांचा प्रतीक्षा लहाने हिच्याशी विवाह झाला. या विवाहात प्रतीक्षाला स्त्रीधन म्हणून ६४ हजार ४४० रुपयांचे सोन्याचे दागिने घालण्यात आले. याशिवाय काही दिवस सासरी राहिल्यावर पाच हजार रुपयांचा मोबाईलही देण्यात आला. परंतु थोड्याच दिवसात प्रतीक्षा ही ७५ हजार रुपये किमतीचा १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा,५४ हजाराची रोख रक्कम आणि मोबाईल हँडसेट,अंगावरील दागिण्यासह पसार झाली.

हा विवाह बनावट होता. आणि आपण या प्रकरणात फसवणू झाल्याचे लक्षात आल्यानंतर हुकुमचंद भदाणे यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी तक्रारीवरुन नववधूसह मध्यस्थी आणि अन्य अशा सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

हुकूमचंद भदाणे यांची फसवणूक करणाऱ्या नववधूसह अन्य संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. निलेश मोरे (सहायक पोलीस निरीक्षक, नरडाणा पोलीस ठाणे)