नाशिक – अप्पर वैतरणा धरणाच्या दक्षिणेकडे ओंडली, नागोसली व वैतरणा कॉलनी या गावांच्या परिसरात ढोऱ्या डोंगर आहे. मविप्र शिक्षण संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांना या डोंगरावर अतिदुर्मिळ व असुरक्षित ऑर्किड कुळातील लहानशी परंतु, आकर्षक वृक्ष आश्रित प्रजाती सापडली आहे. तिची अंडाकृती पाने फुलपाखरासारखा भास निर्माण करतात.
जिल्ह्यातील ढोऱ्या डोंगरावर’ ‘असुरक्षित’ प्रोपॅक्स जर्दोनियाना वनस्पतीचा शोध लागल्याचे केटीएचएम महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाने म्हटले आहे. स्थानिक भाषेत या वनस्पतीला ‘फुलपाखरू अमरी’ असेही म्हणतात. प्रा. डॉ. ज्ञानेश्वर खांडबहाले, अन्य प्राध्यापक आणि विद्यार्थी कन्हैया थेटे, हेमंत चौरे या विद्यार्थ्यांनी ती शोधली. ढोऱ्या डोंगराच्या उभट कातळकड्यांवर या वनस्पतीचा नैसर्गिक अधिवास आढळून आला.
जिल्ह्यात ही प्रजाती प्रथमच नोंदली गेल्याने जिल्ह्याच्या जैवविविधतेत अभिमानास्पद नोंद झाली. विशेष म्हणजे, देशातील काही भागात ही दुर्मिळ वनस्पती मुख्यत्वे मोठ्या वृक्षांचा आधार घेऊन वाढताना आढळते. मात्र, नाशिकमध्ये ती समुद्रसपाटीपासून सुमारे ७२२ मीटर उंचीवर थेट खडकांवर वाढताना आढळली.
डॉ. ज्ञानेश्वर खांडबहाले यांनी ‘आययूसीएन’ लाल यादीनुसार या वनस्पतीचा दर्जा असुरक्षित असा आहे. म्हणजेच तिच्या नैसर्गिक अधिवासाचा नाश व इतर घटकांमुळे ती नामशेष होण्याच्या धोक्यात आहे. अशा स्थितीत ढोऱ्या डोंगरावर झालेली ही नोंद स्थानिक जैवविविधतेच्या अभ्यासासाठी आणि वनस्पती संरक्षणासाठी एक महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी पर्यावरणातील बदल, जंगलतोड व अधिवास नष्ट होण्यामुळे वृक्ष आणि प्राणी यांच्या अनेक प्रजाती आज संकटात असल्याने अशा अति दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन अत्यावश्यक असल्याकडे लक्ष वेधले. या संशोधनात्मक कामगिरीबद्दल मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी सर्वांचे अभिनंदन करीत अशाच प्रकारे निसर्ग सेवेची अपेक्षा व्यक्त केली.
वनस्पतीची ओळख
प्रोपॅक्स जर्दोनियाना ही ऑर्किडेसी कुळातील प्रजाती असून ती फक्त भारतीय उपखंडात आढळते. आकाराने लहान असली तरी तिची रचना अतिशय देखणी आहे. झाडांच्या खोडांवर शेवाळांसोबत वाढणारी ही प्रजाती मुख्यत्वे दक्षिण भारत आणि उत्तर अंदमान येथे आढळते.
स्वरुप कसे ?
ही वनस्पती झाडांच्या खोडावर, शेवाळांच्या सोबतीने उगवते. तिची ०.५–१ सेंटी मिटर आकाराची बटणासारखी गाठीसदृश ‘प्स्यूडोबलब्स’ एकमेकांच्या अगदी जवळ, तंतुमय जाळ्याने झाकलेली असतात. प्रत्येकी दोन, समोरासमोर असलेली, १–२ सेंटीमीटर लांबीची, सुंदर नक्षीदार, अंडाकृती पाने फुलपाखरासारखा भास निर्माण करतात. फुलोरा छोटा असून, प्रत्येक ‘प्स्यूडोबलब’वरून १–२ फुले जून-जुलै महिन्यांत उमलतात.