नाशिक – कुख्यात दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्याबरोबर पार्टी केल्याच्या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटाने नुकतीच बडगुजर यांना महानगरप्रमुखपदावरून जिल्हाप्रमुखपदी बढती दिली आहे. शहर गुन्हे शाखेकडून सलीम कुत्ताबरोबरच्या पार्टी प्रकरणाची चौकशी सुरू होती. त्यात बडगुजरांचा सहभाग निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ताबरोबर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केला होता. त्यावेळी त्यांनी पार्टीची छायाचित्रे आणि चित्रफित सादर केली होती. तेव्हा सरकारने या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशीची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. या पार्टीच्या आयोजनात बडगुजर यांचा सहभाग आढळून आल्याचे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार

या चौकशीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आधीच आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. टाडा न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ बडगुजर हे पार्टी देतात, ही अतिशय गंभीर गोष्ट असल्याचे शिवसेना शिंदे गटाने म्हटले होते. आरोपीसोबत ‘मैं हूँ डॉन’ या गाण्यावर थिरकणे हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. ही पार्टी कधी, कुठे झाली, बॉम्बस्फोटातील आरोपी बाहेर कसा आला, हे पोलीस तपासात उघड होईल, असे संबंधितांकडून सांगितले गेले. बडगुजर यांच्या पार्टीचे प्रकरण बाहेर निघाल्यानंतर ठाकरे गटाने भाजपच्या नेत्यांनीही दाऊदच्या एका नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यात लावलेल्या हजेरीची छायाचित्रे प्रसारित केली होती.

हेही वाचा – शिरपूर उपविभागीय अधिकाऱ्याचा वाहन चालक लाच प्रकरणात ताब्यात

दरम्यान, बडगुजर हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. नगरसेवक पदाचा दुरुपयोग करुन स्वत:च्या कंपनीला महापालिकेतील विविध कामांचा ठेका मिळवून देत आर्थिक लाभ घेतल्याप्रकरणी बडगुजर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणात ते सध्या जामिनावर आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाने जिल्हा संघटनेत नुकतेच फेरबदल केले. वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असणारे महानगरप्रमुख बडगुजर यांना बढती देऊन जिल्हाप्रमुख करण्यात आले आहे.