नाशिक – गणेश उत्सवाच्या १० दिवसांमध्ये गणरायाच्या सरबराईत काहीच कमी पडू नये म्हणून प्रत्येकाची धडपड सुरु असते. वातावरण मंगलमय राहण्यासाठी मंजुळ गाणी घराघरातून ऐकू येतात. या काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. परंतु, गणेशोत्सवाचे केवळ पाच दिवस बाकी असतानाही कॅसेट, सीडीची बाजारपेठ आजही ग्राहकांच्या प्रतिक्षेत आहे.

कुठल्याही उत्सवात रंग आणण्यासाठी गाण्यांचा मोठा वाटा असतो. सार्वजनिक उत्सव, मंगलकार्यात गाणी धमाल उडवून देतात. ही गाणी वातावरण निर्मीती करतात. कामासाठी उत्साह, उर्जा देतात. पूर्वी कोणतेही मंगलकार्य असले की दाराबाहेर सनई चाैघडे वाजायचे. महिलांकडून गाणी म्हटली जात असत. कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमात मंगलगाणी वाजवली जात.

कालानुरूप ती जागा कॅसेट आणि त्यानंतर सीडीने घेतली. सद्यस्थितीत ही जागा आता समाज माध्यमातील युट्युबने घेतली आहे. या बदलत्या तंत्रज्ञानाचा फटका बाजारपेठेला बसत आहे. कॅसेट, सीडीची बाजारपेठ यामुळे पूर्णत: कोलमडली असून अनेकांना पर्यायी काम शोधावे लागत आहे. नाशिक शहर तसेच जिल्ह्यात ३०० हून अधिक कॅसेट, सीडी विक्रीची दुकाने होती. सार्वजनिक शिवजयंती, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासह अन्य उत्सव काळात महापुरूषांची,सण उत्सवाची गाणी वाजली जात होती.

मध्यरात्रीपासून गाण्यांच्या माध्यमातून जागर व्हायचा. वातावरणात उत्साह असायचा. यंदाही उत्साह कायम असला तरी त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची किनार आहे. परंतु, या आधुनिकतेने काही व्यावसायिकांपुढे जगावे कसे, हा प्रश्न उपस्थित करुन ठेवला. याविषयी सीडी विक्रेते योगेश आव्हाड यांनी व्यथा मांडली. वयाच्या १५ व्या वर्षापासून ते या व्यवसायात काम करत आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव सुरु होण्याच्या दोन ते तीन दिवसात दिवसाला २००-३०० कॅसेट विकल्या जायच्या. २००८ नंतर सीडी बाजारात आल्या.

प्रसिध्द कंपन्यांच्या सीडी ९०-१२० रुपयांच्या पुढे तर अन्य सीडी ५० रुपये दराने विकल्या जायच्या. उत्सव काळात या सीडींना मागणी असायची. दिवसाकाठी ३०-५० सीडी विकल्या जात. इतर वेळीही लहान मुलांना शिकवण्यासाठी बडबडगीते, काही अभ्यासाची गाणी असलेल्या सीडी विकल्या जात. परंतु,. २०२० पासून स्मार्टफोन बाजारात आला. आणि सर्व चित्र बदलले.

भ्रमणध्वनीवरील युट्युबला ब्लुटुथ जोडले की ध्वनिक्षेपकाच्या मदतीने गाणी लावली जातात. सर्व काही सोपं झाले. यामुळे आमच्या व्यवसायावर गदा आली. आता गणेशोत्सव सुरू होऊन पाच दिवस झाले असले तरी केवळ दोन सीडी विकल्या गेल्या. त्यातून १०० रुपये मिळाले. गुंतवलेले भांडवलही निघत नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले. लहानपणापासून या व्यवसायात असल्याने तो सोडवत नाही. या व्यवसायाला जोडधंदा म्हणून कपडे व्यवसाय सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात अन्य विक्रेत्यांचीही हीच व्यथा असल्याचे त्यांनी नमूद केले.