नाशिक – तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर जातात. त्र्यंबकेश्वर दर्शन आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी जिल्ह्यासह राज्यातून भाविक येणार असल्याने शहरातील मेळा बस स्थानकात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, मेळा बस स्थानक परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

श्रावणातील तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी त्र्यंबकेश्वरला जाण्याकरिता भाविक शहरातील मेळा बस स्थानकात जमा होतात. त्यामुळे या स्थानकात गर्दी होते. १० आणि ११ ऑगस्ट हे दोन दिवस होणारी गर्दी लक्षात घेत मेळा बस स्थानक ते ठक्कर बाजाराजवळील मनसे कार्यालय हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.

या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तालुका पोलीस ठाणे, मेळा बस स्थानकापासून ते मनसे कार्यालय या रस्त्याने केवळ राज्य परिवहन महामंडळ आणि सिटीलिंकची शहर बससेवा ये-जा करणार आहे. रविवार आणि सोमवार हे दोन दिवस तालुका पोलीस ठाणे ते ठक्कर बाजारकडे जाणारी वाहतूक सीबीएस सिग्नल – मोडक सिग्नलमार्गे वळविण्यात आली आहे. १० ऑगस्ट रोजी दुपारी दोनपासून ११ ऑगस्टच्या रात्री १० पर्यंत हे नियम लागु राहणार आहेत. वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना प्रवेश बंद

तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त ग्रामीण पोलिसांच्या वतीने त्र्यंबकेश्वर परिसरातही वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार वाहतूकक मार्गात बदल, भाविकांच्या वाहनांचे बाह्य वाहनतळांचे नियोजन करण्यात आले. रविवारी दुपारी १२ पासून सोमवारी रात्री १० पर्यंत नाशिककडून त्र्यंबकेश्वरमार्गे जव्हारकडे जाणाऱ्या आणि जव्हारकडून त्र्यंबकेश्वरमार्गे नाशिककडे येणाऱ्या सर्व खासगी वाहनांना त्र्यंबकेश्वर शहरात प्रवेश बंद राहणार आहे.

नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाहनधारकांसाठी खंबाळे वाहनतळ करण्यात आला आहे. या ठिकाणाहून राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेव्दारे जुना जव्हार फाटा, गजानन महाराज चौक, सिंहस्थ बस स्थानक येथे भाविकांना जाता येईल. जव्हार आणि गिरणारेमार्गे त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी आंबोली वाहनतळ करण्यात आला आहे. त्या ठिकाणाहून बसने भाविक त्र्यंबकमध्ये येतील. मुंबई, इगतपुरी, घोटी, वैतरणामार्गे त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या भाविकांची वाहने पहिने टी पॉईंट येथे उभी करण्यात येतील. या ठिकाणाहून बसने भाविक त्र्यंबककडे येतील. या काळात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहनचालकांनी सातपूर येथून गोवर्धन शिवार, गिरणारे, धोंडेगाव, देवरगाव, वाघेरा फाटा, अंबोली फाटासह अन्य पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.