नाशिक : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी शहर पोलीस सरसावले आहेत. भाई, दादा, डॉनच्या तोंडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला वदवून घेतले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी नाशिक पोलीसांना पाठबळ देत मुक्तहस्ते कारवाई करा, असा आदेश दिल्याने पोलीस नव्या दमाने कामाला लागले आहेत. शनिवारी भाजपचा माजी नगरसेवक मुकेश शहाणे, भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरे यांच्यासह इतर राजकीय पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांची चौकशी करण्यात आली. संबंधितांना आर्थिक पाठबळ कुणाचे, यासह त्यांच्याशी संबंधित अन्य राजकीय लोकांची माहिती घेतली जात आहे.
सातपूर येथील हॉटेल ऑरो येथे रविवारी झालेल्या गोळीबारात एक ग्राहक जखमी झाला. या प्रकरणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (आठवले) नाशिक जिल्हाधिकारी तथा माजी नगरसेवक प्रकाश लोंढे याचा मुलगा भूषण लोंढे आणि त्याच्या टोळीचा सहभाग उघडकीस झाला. सातपूर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. प्रकाश लोंढे, त्याचा मुलगा दीपक लोंढे यासह तीन जणांना सहआरोपी करण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून भूषण लोंढे फरार आहे. दुसऱ्या एका प्रकरणात जुन्या वादातून भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सुनील बागूल यांचा पुतण्या अजय बागूलसह टोळीने तिघांवर प्राणघातक हल्ला केल्याने सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात सुनील बागूल यांचा दुसऱा पुतण्या गौरव बागूलचा समावेश आहे. गौरवसह इतरांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या सर्व प्रकरणात गुन्हेगारांवर असणारा राजकीय वरदहस्त उघड होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी कोणाचीही भीड न ठेवता गुन्हेगार असेल तर त्याची चौकशी करा असा आदेश दिल्याने पोलीस दल पुन्हा नव्या जोमाने कामास लागले आहे.
आतापर्यंत भाजपचे दोन माजी नगरसेवक गुन्हेगारी प्रकरणी कारागृहात असताना शनिवारी भाजपचा अजून एक माजी नगरसेवक मुकेश शहाणे याची तसेच भाजप माथाडी कामगार आघाडीचा पदाधिकारी व्यंकटेश मोरे यांना स्थानिक गुन्हे शाखा क्रमांक एक येथे चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. याशिवाय अन्य राजकीय पक्षाशी संबंधित गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची चौकशी करण्यात येणार आहे. संबंधितांना आर्थिक रसद कोण पुरवते, त्यांनी राजकीय पदाचा गैरवापर कसा केला, त्यांच्यावरील दाखल गुन्हे आदींची चौकशी करण्यात येत आहे.
सातपूर येथील हॉटेल गोळीबार प्रकरणात आतापर्यंत नऊ संशयितांना अटक करण्यात आली आहे. भूषण लोंढेसह अन्य काही आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची दोन आणि सातपूर पोलिसांचे एक अशी तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. किशोर काळे (पोलीस उपायुक्त, नाशिक)