जळगाव – राज्यातील सत्तासंघर्षावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडून निकाल दिला जाणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. बुधवारी जळगावात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तासंघर्षावर सर्वांना शुभेच्छा, असे म्हणून बोलणे टाळले; तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, कसला सत्तासंघर्ष, असा प्रश्न करीत सत्याचाच विजय होतो आणि सत्याचाच विजय होईल. काहीही सत्तासंघर्ष नाही, असा टोला विरोधकांना हाणला.
हेही वाचा >>> कोंबड्यांवर विष प्रयोग? कळवणमध्ये ४०० पक्षी मृत्यूमुखी
चोपडा येथील शिंदे गटाच्या आमदार लताबाई सोनवणे आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची कन्या डॉ. अमृता हिच्या विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदे जळगाव येथे आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनिकर्ममंत्री दादाजी भुसे उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील, सुरेश भोळे, चिमणराव पाटील, चंद्रकांत पाटील या आमदारांसह जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले.
काहीही सत्तासंघर्ष नाही – मुनगंटीवार
आमदार लताबाई सोनवणे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली. यावेळी वनमंत्री मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी अवघ्या पाच मिनिटांच्या संवादात महाविकास आघाडीवर घणाघात केला. गुरुवारी सर्वोच्च न्यायालाच्या घटनापीठाकडून राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यावर मंत्री मुनगंटीवर यांनी भाष्य केले. सत्तासंघर्ष असता तर आम्ही या कार्यक्रमाला दिसलो असतो का, असा प्रश्न केला. असे अपात्र करता येत नाही. अपात्रतेचा आता प्रश्न उपस्थित होत नाही. सत्याचाच विजय होतो, सत्याचाच विजय होईल. काही लोक हवा पसरविण्याचा प्रयत्न करताहेत, मायावी विचार मांडताहेत, गैरसमज निर्माण करताहेत; पण निश्चितपणे सांगतोय, काहीही सत्तासंघर्ष नाही. जनतेच्या विकासासाठी आम्ही काम करतोय आणि पुढेही काम करणार आहोतच. मुंगेरीलालचे डीएनए असणारे लोकही आता असल्याचे वाटतेय, असा टोलाही मुनगंटीवार यांनी ठाकरे गटाला हाणला.
कर्नाटकमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री – महाजन
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल सकारात्मकच लागेल आणि भाजपचाच मुख्यमंत्री होईल. पोल-बिलवर विश्वास नाही. मध्यंतरी बिहार व उत्तर प्रदेशातील निवडणुकीबाबत झाले, तसेच कर्नाटकच्याच बाबतीत होणार आहे. तेथील लोकांची मानसिकता भाजपचा मुख्यमंत्री करण्याचीच आहे. त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच विश्वास आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये भाजपचीच सत्ता येऊन मुख्यमंत्रीही होईल, असा दावा भाजप नेते ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केला. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळेल, या राऊत यांच्या भाष्यावर महाजन यांनी तोफ डागली. त्यांनी स्वप्नं पाहत राहावीत. त्याशिवाय त्यांच्याकडे काहीच राहिले नाही. त्यांच्याकडे दहा आमदार राहिले नाहीत, चार खासदार राहिले नाहीत. शिवसेना पक्ष आणि चिन्हही राहिले नाही. स्वप्न पाहायला पैसे लागतात का? ते स्वप्न पाहत आहेत, असे महाजन यांनी नमूद केले.