नाशिक: इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन विश्वाचे वेध लागतात. परंतु, त्याचवेळी पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात पुढे काय, हा प्रश्न उभा राहत असल्याने शिक्षण विभागाच्या डायट विभागाच्या वतीने कल चाचणी घेण्यात येते. यंदाही ७०० विद्यार्थ्यांनी कल चाचणीसाठी अर्ज केले आहेत. परंतु, अकरावी प्रवेश प्रक्रियेस अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक असतानाही ही चाचणी झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात गोंधळ आहे.

दहावीनंतर पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर शोधतांना अनेकदा गोंधळ उडतो. पालकांच्या अपेक्षा आणि मुलांच्या इच्छा याचे गणित क्वचितच जमते. काही वेळा उत्साहाच्या भरात विद्यार्थ्यांकडून आवडीच्या नावाखाली एखादी शाखा निवडली जाते. पण तो अभ्यासक्रम झेपला न गेल्यास मुले नैराश्यात जातात. या पार्श्वभूमीवर, शिक्षण विभागाच्या डायट विभागाच्या वतीने कल चाचणी घेण्यात येते.

यासाठी मुंबई, पुणे या ठिकाणी ही व्यवस्था होती. आता नाशिकमध्येही व्यवस्था करण्यात आली. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता तालुकानिहाय या परीक्षा होणार होत्या. त्यानुसार शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर ७०० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले.

दरम्यान, २१ मेपासून आभासी पध्दतीने अकरावी प्रवेश प्रक्रियेस आरंभ होणार आहे. तरीही कल चाचणी झालेली नाही. याविषयी डायट नाशिक विभाग प्रमुख शिवाजी औटी यांनी माहिती दिली. अद्याप ही परीक्षा झालेली नाही. याबाबत समूपदेशकांना सूचना करुन लवकरच ही परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी विद्यार्थी जास्त तसेच समूपदेशक असतील, त्या ठिकाणी केंद्र घेत परीक्षा होईल, असे औटी यांनी सांगितले.
दुसरीकडे, परीक्षा कधी होईल, परीक्षेचा निकाल कधी लागणार, याविषयी पालकांच्या मनात संभ्रम आहे.