धुळे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, भाजपच्या जोमदार तयारीला आता काँग्रेसने तोडीस तोड प्रतिसाद दिला आहे. भाजपने संघटनात्मक मोर्चेबांधणी सुरू केल्यानंतर काँग्रेसनेही आगामी निवडणुकांसाठी रणनिती ठरविणे आणि संघटन मजबूत करण्यासाठी सक्रिय पावले उचलली आहेत.
उद्या ७ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता धुळे येथील काँग्रेस भवनात महत्त्वाची आढावा बैठक होणार असून, या बैठकीत जिल्हा आणि शहर काँग्रेसचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार तसेच कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे आणि शहराध्यक्ष हाजी साबीर शेख यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
भाजपप्रमाणेच काँग्रेसनेही निवडणुकीसाठी मजबूत संघटन उभारण्याचा ध्यास घेतला आहे. यासाठी विधानसभा स्तरावर निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. साक्रीसाठी भरत टाकेकर, धुळे ग्रामीणसाठी राजाराम पानगव्हाणे, धुळे शहरासाठी जावेद फारूकी, शिंदखेड्यासाठी धनंजय चौधरी आणि शिरपूरसाठी रमेश कहानडोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या निरीक्षकांना मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, संभाव्य उमेदवारांची यादी तयार करणे आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करणे यांसारख्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. विधानसभा प्रभारींना १५ दिवसांच्या आत मंडळ प्रमुखांची नियुक्ती करण्याचे, तसेच ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्कलनिहाय व शहरी भागात प्रभागनिहाय पदाधिकारी नेमण्याचे निर्देश दिले आहेत.
या हालचालीमुळे काँग्रेसच्या तळागाळातील संघटनाला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच निरीक्षकांना गटबाजी दूर करून पक्ष एकसंघ करण्याचे आणि राजकीय तसेच अराजकीय प्रतिष्ठित व्यक्तींशी संवाद वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर धुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदललेली दिसत आहेत. काँग्रेसला आता आपले गढ टिकवण्यासाठी आणि निवडणुकीत सशक्त पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत थेट सामना होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली असून, धुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
