नाशिक  – भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू, आयपीएलमधील तारांकित खेळाडू यांचा खेळ पाहण्याची संधी दिल्ली, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई आदी मोठ्या शहरांमधील क्रिकेट रसिकांना कायमच मिळत असते. नाशिकसारख्या शहरातील क्रिकेटप्रेमींनाही अशी संधी रणजी सामन्यांमुळे मिळते. यंदाच्या रणजी हंगामात आक्रमक ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, जलदगती गोलंदाज जयदेव उनाडकट नवोदित अर्शिन कुलकर्णी यांसारख्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय)  १ ते ४  नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा चार दिवसीय रणजी सामना हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे. मागील वर्षी २०२४-२५ च्या हंगामात नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघाला मिळालेल्या निर्विवाद विजयामुळे आणि नाशिकमधील क्रीडा रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे खुश झालेल्या महाराष्ट्र संघाने यावर्षी देखील नाशिक येथे रणजी सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळेच  नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या उत्कृष्ट आयोजनामुळे यंदा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने रणजी सामना नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनला आयोजित करण्याची संधी दिली आहे.

या रणजी सामन्यानिमित्ताने जयदेव उनाडकट, ऋतुराज गायकवाड आणि महाराष्ट्र संघात या रणजी हंगामात सामील झालेला क्रिकेटपटू पृथ्वी शॉ यासारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा तसेच काही तारांकित आयपीएल खेळाडूंचा खेळ बघण्याची संधी नाशिककरांना मिळेल. २०२५-२६ हंगामातील दोन सामन्यात महाराष्ट्राने केरळविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे तर चंदीगडविरुध्द विजय मिळवून गुण वसूल केले आहेत. त्यामुळे गटात महाराष्ट्र दोन सामन्यात नऊ गुणांसह आघाडीवर आहे. सौराष्ट्रने कर्नाटकविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवले आहेत.

नाशिकमधील या रणजी सामन्यात क्रिकेट रसिकांना जोरदार व रंगतदार खेळाची अपेक्षा आहे. मागील हंगामातील सामन्यातदेखील ऋतुराज गायकवाड, कृणाल पंड्या या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी नाशिककरांना मिळाली. मुर्तुझा ट्रंकवाला ,सत्यजित बच्छाव व रामकृष्ण घोष हे तीन नाशिककर क्रिकेटपटू १६ जणांच्या मागील हंगामातील महाराष्ट्र क्रिकेट चमूत समाविष्ट होते.

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा यांच्या नेतृत्वाखाली, सचिव समीर रकटे, जिल्हा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व सर्व संबंधितांना यापूर्वीच्या अकरा पेक्षा जास्त रणजी सामन्यांच्या दिमाखदार व यशस्वी आयोजनाचा उत्तम अनुभव आहे.