धुळे : देवपूर येथील महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विशेष शिक्षिका सुजाता शंखपाळ यांची बदली रद्द करून पुन्हा त्याच ठिकाणी तात्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी आज कर्णबधिर विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या लेखी निवेदनातून केली.
गेल्या १९ वर्षांपासून कर्णबधिर (१०० टक्के) विद्यार्थ्यांना विशेष पद्धतीने शिकवणाऱ्या या शिक्षिकांची अचानक बदली केल्याने विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्येही संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अनुषंगाने आज कर्णबधिर विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपडे यांना लेखी निवेदन दिले. यावेळी पंकज साळुंखे, एकनाथ पाटील, जुनेदअली बरकतअली खान, प्रवीण महाजन, उदय पाटील, यश भंडारी, वैभव पाटील, दीपक तेली, सई देवरे आदी यावेळी उपस्थित होते.
शाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटूनही एकही कर्णबधिर विद्यार्थी शाळेत जाण्यास तयार नाही, ही चिंताजनक बाब पालकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. कर्णबधिर विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णपणे कौशल्याधारित असल्याने अध्यापनासाठी प्रशिक्षित, पात्र आणि अनुभवी विशेष शिक्षिकेची आवश्यकता असते. सुजाता शंखपाळ यांनी बी.एड. एच.आय. (हियरिंग इम्पेअरमेंट) शिक्षण घेतले असून संकेतभाषा, संवाद पद्धती आणि अध्यापन तंत्रात त्या पारंगत असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा पूर्ण विश्वास त्यांच्यावर निर्माण झाला आहे.
पालकांनी स्पष्ट केले की, नवीन शिक्षकांची नियुक्ती झाली तरी ते विद्यार्थ्यांशी उत्तम संवाद साधू शकतील याची कोणतीही हमी नाही. पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेताना या विद्यार्थ्यांनी शंखपाळ यांच्याशी भावनिक नाते तयार केले आहे. नवीन शिक्षकांशी पुन्हा जुळवून घेणे कर्णबधिर मुलांसाठी अत्यंत कठीण ठरेल, यावर पालकांनी भर दिला.
अनेक पालकांनी आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून शाळेजवळ भाड्याने खोली घेतली आहे. एका विद्यार्थ्याच्या राहणीमानावर किमान तीन हजार ५०० रुपये मासिक खर्च होतो. तरीही मुलांचे भविष्य उजळावे म्हणून हा खर्च ते सहन करीत आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या सर्व परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शंका न ठेवता सुजाता शंखपाळ यांचीच प्रतिनियुक्ती तातडीने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही पालकांनी दिला. या घटनेमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील विशेष तज्ज्ञ अध्यापकांचे महत्त्व, बदली धोरणातील संवेदनशीलता आणि प्रशासनाचा दृष्टिकोन यांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुढील निर्णय काय होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
