नाशिक : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या ओझर प्रकल्पात ‘तेजस –एमके १ए‘ची तिसरी उत्पादन साखळी आणि एचटीटी – ४० या प्रशिक्षणार्थी विमानाच्या दुसऱ्या उत्पादन साखळीच्या उद्घाटन सोहळ्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सिंदूर मोहिमेतील कामगिरीकडे लक्ष वेधले. सुरक्षाविषयक इतिहासात संपूर्ण व्यवस्थेची एकाच वेळी खरी कसोटी लागल्याची अगदी मोजके प्रसंग आहेत. सिंदूर मोहीम त्यापैकीच एक होती. या मोहिमेत सुखोई – ३० एमकेआय लढाऊ विमानांनी ब्रम्होसद्वारे पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. या कारवाईत नाशिकचे महत्वाचे योगदान राहिल्याचे त्यांनी नमूद केले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची एचएएल नाशिकला ही पहिलीच भेट होती. त्यांनी प्रकल्पातील अत्याधुनिक यंत्रसामग्री, उपकरणे व पायाभूत सुविधांची पाहणी केली. आजवर या प्रकल्पात मिग-२१ एम, मिग-२१ बीआयएस, मिग-२७ एम आणि अत्याधुनिक सुखोई-३० एमकेआय या विमानांची निर्मिती झाली. मिग मालिकेतील विमानांची संपूर्ण देखभाल-दुरुस्ती करण्यात आली. रशियाच्या मदतीने मिग – २१ बीआयएस मालिकेतील विमाने आणि स्वदेशी बनावटीच्या मिग २७ विमानांचे अद्ययावतीकरणही करण्यात आले.

‘तेजस एमके – १ ए’ आधी या प्रकल्पात सुमारे २५० सुखोई विमानांची निर्मिती झाली झाली आहे. त्यांची देखभाल दुरुस्ती, या विमानावर ब्राम्होस क्षेपणास्त्र बसविण्याचे काम या ठिकाणी झाले आहे. आपल्या भाषणात सिंह यांनी या सर्वाचा आढावा घेतला. एचएएल नाशिक प्रकल्पात मिग, सुखोई ३० एमकेआय पाठोपाठ आता ‘तेजस एमके-१ ए’ आणि एचटीटी – ४० प्रशिक्षणार्थी विमानाचे निर्मिती होऊन त्यांनी अवकाशात घेतलेले उड्डाण हे देश आणि संरक्षण विभागासाठी अभिमानाची बाब आहे. हे केवळ गौरवाचे उड्डाण नसून आत्मनिर्भर भारताचे उड्डाण असल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

अत्याधुनिक, स्वदेशी तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्याच्या दृष्टिकोन पुढे नेण्यात एचएएल महत्वाची भूमिका निभावत आहे. सिंदूर मोहिमेतील योगदानाबद्दल त्यांनी एचएएलचे कौतुक केले. या मोहिमेत एचएएलचे तंत्रज्ञ, अभियंते २४ तास भारतीय हवाई दलाच्या तळांवर देखभाल-दुरुस्तीत कार्यरत होते. त्यांच्यामुळे लढाऊ विमाने युद्धसज्ज राखता आली. एचएएल नाशिकमध्ये सुमारे २५० हून अधिक सुखोई – ३० एमकेआय लढाऊ विमानांची निर्मिती झाली. येथील तंत्रज्ञांनी या विमानांमध्ये ब्राम्होसचा अंतर्भाव केला. सिंदूर मोहिमेत सुखोई विमानांमधून डागलेल्या ब्राम्होसने पाकिस्तानातील दहशतवादी तळ नष्ट केले होते. जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येतो, तेव्हा आपण स्वतःची उपकरणे तयार करू शकतो आणि त्यांच्या मदतीने स्वतःचे संरक्षण करू शकतो, हीच बाब या घडामोडींतून सिद्ध झाली, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.