धुळे : येथील महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ प्रभागांतील ७४ जागांच्या आज आरक्षण सोडत काढण्यात आली. यात ३७ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत,पैकी तीन जागा अनुसुचित जमाती (एस.टी) प्रवर्गातील महिलांसाठी तर अनुसुचित जाती (एस.सी.) प्रवर्गातील महिलांसाठी तीन जागा राखीव असतील.
नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलांसाठी १० जागा आरक्षीत झाल्या आहेत. अनुसुचित जमाती (एस.टी) प्रवर्गासाठी एकुण ५ जागा आरक्षणीत ठरल्या आहेत, तर अनुसुचित जाती (एस.सी.) प्रवर्गासाठी ५ जागा आरक्षीत असून ओबीसी प्रवर्गासाठी महिलांसह एकुण १८ जागा आरक्षीत झाल्या आहेत. उर्वरित जागा सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी असणार आहेत.
धुळे महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार आज सकाळी धुळे शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिर येथे धुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने १९ प्रभागातील आरक्षण सोडत काढण्यात आली. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शन आणि देखरेखी खाली आरक्षण सोडत प्रक्रीया नियमांनुसार तसेच शांततेत पार पडली. यावेळी मनपा उपायुक्त हेमंत निकम, अतिरीक्त आयुक्त करुणा डहाळे, मनपा सचिव मनोज वाघ यांच्यासह प्रमुख अधिकारी आणि कर्मचा-यांनी आरक्षण सोडतीचे कामकाज सांभाळले.
शालेय विद्यार्थ्यांच्या हाताने आरक्षीत होणा-या प्रभागांचे क्रमांक रोलरमध्ये फिरवून काढण्यात आले. पारदर्शकपणे आरक्षण सोडतीची प्रक्रीया व्हावी यासाठी सर्व प्रक्रीयेचे व्हिडीओ चित्रीकरण देखील करण्यात आले. विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी आणि माध्यम प्रतिनिधींच्या समक्ष ही आरक्षण सोडत प्रक्रीया पार पडली. धुळे महापालिकेच्या १९ प्रभांगापैकी १८ आणि १९ हे दोन प्रभाग लोकसंख्येच्या प्रमाणानुसार प्रत्येकी तीन सदस्यांचे असून उर्वरित सर्व १७ प्रभाग प्रत्येकी ४ सदस्यांचे निश्चीत करण्यात आले आहेत. यातील प्रभाग क्रमांक १८ मधील तीन पैकी दोन जागा या महिलांसाठी राखीव निघाल्या आहेत, तर प्रभाग १९ मध्ये एक जागा ओबीसी महिला सदस्यासाठी राखीव असून उर्वरित दोन जागा सर्वसाधारण सदस्यांसाठी असणार आहेत.
प्रभाग क्रमांक १८ मधील दोन पैकी १८-अ ही जागा अनुसुचीत जाती (एस.सी.) महिला राखीव तर प्रभाग क्र. १८-ब ही जागा अनुसुचित जमाती (एस.टी.) महिला राखीव आहे. प्रभाग क्र.१८-क सर्वसाधरण सदस्यासाठी असेल. त्यामुळे प्रभाग क्र. १८ मध्ये केवळ एक पुरुष उमेदवार निवडणुक लढवू शकेल. प्रभाग क्र. १९ महिल १९-अ महिला ओबीसी राखीव निघाला आहे. तर १९ ब आणि १९-क ह्या जागा सर्वसाधारण सदस्यांसाठी अर्थात येथे खुल्या प्रवर्गातील दोन पुरुष उमेदवार निवडणुक लढवणार आहेत. उर्वरित प्रभागांपैकी ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी १० जागा आरक्षीत ठरल्या आहेत. तर ८ जागा ओबीसी महिला-पुरुष उमेदवारांना लढवता येणार आहेत.
आज काढण्यात आलेली आरक्षण सोडतीची सविस्तर माहिती निवडणुक आयोगाकडे सादर करणार असल्याची माहिती यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. या आरक्षण सोडती बाबत आक्षेप आणि हरकती हरकती घेण्यासाठी १७ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. नागरीकांनी आपल्या हरकत विहीत नमून्यात महापालिका निवडणुक कार्यालयात द्यावी, असे आवाहन यावेळी आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले.
नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
महिलांसाठी राखीव प्रभाग – क्र. १-अ, प्रभाग क्र. २-ब, प्रभाग क्र. ३ब, प्रभाग क्र. ४-अ, प्रभाग क्र. ५-ब, प्रभाग क्र. ६-ब, प्रभाग क्र. ७-क, प्रभाग क्र. ८-क, प्रभाग क्र. १०-ब, प्रभाग क्र. १९-अ अशा एकुण १० जागा महिला ओबीसी राखीव ठरल्या आहेत.
अनुसुचित जमाती प्रवर्ग (एस.टी)
महिलांसाठी राखीव प्रभाग – क्र. ३-अ, प्रभाग क्र. ८-ब, प्रभाग क्र. १८-ब
अनुसुचित जाती प्रवर्ग (एस.सी.)
महिलांसाठी राखीव प्रभाग – क्र. ७-अ, प्रभाग क्र.९-अ, प्रभाग क्र. १८-अ
