धुळे : स्थापन झाल्यानंतर पहिलीच निवडणूक असलेल्या पिंपळनेर (ता.साक्री) येथील नगर परिषदेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे. यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
फेब्रुवारी २०२४ मध्ये ’क’ वर्ग पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून अर्ज दाखल करण्याची सुरुवात १० नोव्हेंबरपासून होणार आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर, छाननी १८ नोव्हेंबर, अर्ज मागे घेण्याची शेवटची १९ ते २१ नोव्हेंबर अपील असल्यास त्यावर सुनावणी २५ नोव्हेंबर दरम्यान होईल.२६ नोव्हेंबरला चिन्ह वाटप आणि २ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीत १० प्रभागांमधून २० नगरसेवक निवडले जाणार असून महिला व पुरुष अशा प्रत्येकी १० जागा राखीव आहेत. नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव असल्याने या वेळी स्पर्धा अधिकच रंगतदार होणार आहे. येथील पहिल्याच निवडणुकीतच स्थानिक राजकारणात उष्णता वाढली असून इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी, भेटीगाठी आणि बॅनरबाजीची तयारी सुरू केली आहे. महाआघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये इच्छुकांची चढाओढ सुरू आहे.
भाजपा आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यातील मैत्री टिकणार की बंडखोरीची चिन्हे दिसणार, याची उत्सुकता आहे. दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे हे पिंपळनेरचेच असून त्यांनी या होऊ घातलेल्या निवडणुकी संदर्भात अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे काँग्रेस स्थानिक पातळीवर कोणती रणनीती आखते याकडे काँग्रेसमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकी निमित्त मात्र शिवसेना आणि भाजपातील अनेक इच्छुक सोशल मीडियावर सक्रिय झाले असून स्वतःच्या प्रभागातून निवडणूक लढविण्याच्या पोस्ट टाकत आहेत.यामुळे.साहजिकच निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. काहीजणांनी मोठमोठ्या इमारती आणि बॅनर्सद्वारे आपली ताकद दाखवण्याची तयारीही काहीजणांनी सुरु केली. मात्र, खरे राजकीय खेळाडू अजूनही मैदानात दिसत नसून त्यांच्या शांततेमागचा अंदाज सामान्यजन घेत आहेत, ते अर्ज माघारीनंतरच आपली भूमिका स्पष्ट करतील असा अंदाज आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मात्र तिकीट वाटपाच्या संभाव्य राजकारणाचीही चर्चा होते आहे. काहींची निवडणुकपूर्व नाराजी आणि रुसावा फुगव्याची मालिका सुरू झाली असून ती उघडणे मात्र व्यक्त केली जात नाहीये. यामागे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षासाठी राबतात, आंदोलने करतात; परंतु अंतिम क्षणी त्यांना डावलले जाते, अशी भावना आहे. अशा नाराजीमुळे नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत गटबाजी आणि बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाल्याने सुरुवातीला यावर चांगलीच राजकीय खलबत झाली ; मात्र आता मातब्बर नेत्यांनी आपल्या विचारांच्या महिला उमेदवारांना पुढे करून सत्तेचा मार्ग अधिक सुकर कसा राहील यासाठीचे डावपेच आखणे सुरू केले आहे. तरीही याठिकाणी विद्यमान स्थितीत सत्तास्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची होत चालली असून प्रत्येक हालचालीकडे स्थानिक जनता मोठ्या उत्सुकतेने पाहत आहे. प्रत्येक प्रभागात चर्चेचा विषय म्हणजे कोण उमेदवार उभा राहणार आणि कोणता पक्ष सत्ता प्रस्थापित करणार हा आहे. आगामी काही दिवसांत राजकीय रंगमंच अधिकच तापणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपळनेर नगर परिषदेची ही पहिली निवडणूक धुळे जिल्ह्यातील अन्य नगर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तुलनेत सर्वाधिक चर्चेचा आणि चुरशीचा राजकीय सामना ठरणार आहे.
