धुळे : जिल्ह्यातील वाहतूक नियंत्रण आणि रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस दलाने आता अत्याधुनिक ४ डी रडार स्पिडगन इंटरसेप्टर वाहन ताफ्यात सामील केले आहे. या आधुनिक वाहनामुळे वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित करणे शक्य होणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे व अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या उपस्थितीत हे वाहन जिल्हा पोलीस दलात आज सक्रिय करण्यात आले.
हे वाहन कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अत्याधुनिक प्रणालीवर कार्य करते. वाहनाच्या छतावर बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्याद्वारे आणि ४ डी रडार तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एकाच वेळी अनेक वाहनांची ओळख,गती, क्रमांक आणि नियमभंग ओळखले जाऊ शकतात. या यंत्रणेद्वारे ओव्हर स्पीडिंग, सीट बेल्ट न वापरणे, हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणे, तिघे बसून दुचाकी चालविणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे आणि आकर्षक क्रमांक प्लेट लावणे अशा विविध उल्लंघनांवर त्वरित कारवाई केली जाईल.
या वाहनातील सर्व माहिती थेट संगणक प्रणालीशी जोडली गेली असून नियमांचे उल्लंघन होताच स्वयंचलित पद्धतीने दंडाची पावती तयार होते. त्यामुळे पोलीस दलाचा प्रत्यक्ष हस्तक्षेप कमी होऊन कार्यपद्धती अधिक पारदर्शक आणि जलद होणार आहे. धुळे जिल्हा पोलीस विभाग सातत्याने वाहतूक व्यवस्थेत नवे तंत्रज्ञान आणून सुधारणा करत आहे. या इंटरसेप्टर वाहनामुळे अपघातांवर नियंत्रण मिळविणे आणि नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करणे सोपे होईल. पुढील काळात अशाच तंत्रज्ञानयुक्त वाहनांचा समावेश करून आता रस्ते सुरक्षा आणखी मजबूत करण्यात येणार आहे.
धुळेकरांनी वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे. वाहतूक नियम पाळा, अपघात टाळा हा संदेश समाजात रुजवण्यासाठी पोलिसांकडून सतत जनजागृती करण्यात येणार आहे. धुळे आणि परिसरात वाढत्या रस्ते अपघातांची संख्या चिंताजनक बनली आहे.
दररोजच्या वाहतूक गर्दीत अनेक वाहनचालक वेगमर्यादा ओलांडतात किंवा मोबाईलवर बोलत वाहन चालवतात. अशा निष्काळजी वाहनचालकांमुळे निरपराध नागरिकांचे प्राण जात आहेत. या पार्श्वभूमीवर ४ डी रडार स्पिडगन इंटरसेप्टर सारख्या तंत्रज्ञानामुळे अशा चालकांवर नियंत्रण ठेवता येणार आहे. अपघातानंतर होणारी तपासणी आता प्रत्यक्ष वेळी तांत्रिक पुराव्यांसह होईल, त्यामुळे जबाबदार वाहनचालक घडविण्याकडे हा उपक्रम महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
वाहन गुन्ह्यांचे प्रमाणही अलीकडे वाढले असून, फॅन्सी नंबरप्लेट, बनावट नोंदणी, अवैध बदल तसेच परवाना नसताना वाहन चालविणे यांसारखे गुन्हे वारंवार समोर येतात. अशा प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी हे इंटरसेप्टर वाहन उपयुक्त ठरणार आहे. पोलीस दलाच्या या उपक्रमामुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील वाहतूक शिस्त प्रस्थापित होईल तसेच नागरिकांना नियमपालनाचे महत्त्व पटवून दिले जाईल. सुरक्षित वाहतूक आणि जबाबदार वाहनचालक हा उद्देश साध्य करण्यासाठी धुळे पोलिसांचे हे पाऊल सर्वांसाठी आदर्श ठरणार आहे.
