धुळे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले असताना सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी मात्र शिंदे सेनेची आक्रमक भूमिका तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत. ’रस्त्यावरील खड्डा, भ्रष्टाचाराचा अड्डा’ असे नाव देत शिवसेना शिंदे गटाने आज पारोळा रोडवरील रस्त्यांची बिकट अवस्था, भ्रष्टाचार आणि निष्काळजी आणखी एकदा उघड केला. या आक्षेपार्ह मुद्द्यांवरून शिंदे सेनेने सरळपणे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरले आहे. त्यामुळे रस्ता प्रश्नाने राजकीय स्वरूप घेतले असून, असे अनेक मुद्दे आगामी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकणार असल्याचे दिसते आहे.

शहरातील जुनी महानगरपालिका ते कॉटन मार्केट मार्गे पारोळा रोड चौफुलीपर्यंतचा रस्ता अक्षरशः खड्डेमय झाला आहे. दोन-दोन फूट खोल खड्डे, उघड्या गटारी आणि खराब कामामुळे नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. वाहनचालकांना अपघातांचा धोका वाढला असून, अनेकांना पाठीच्या आणि मानेच्या दुखण्याचा त्रास होऊ लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांच्यातील संगनमतामुळे या रस्त्याची दुरुस्ती होत नाही, असा आरोप स्थानिक नागरिक आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांचा रोष वाढला असून, शिंदे सेनेने या भ्रष्टाचाराचा थेट पर्दाफाश केला आहे. शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महानगरप्रमुख धीरज पाटील व कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटल्यानुसार ठेकेदारांनी दर्जाहीन साहित्य वापरून कमी दर्जाचे रस्ते तयार केले असून, अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले असतानाही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचेही या निवेदनातून निदर्शनास आणून देण्यात आले आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली की, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अन्यथा जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन करू.

दरम्यान, नागरिकांचा मूलभूत हक्क असलेले चांगले रस्ते देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. अनेक जीव गेले आहेत, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत, तरीही जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. हा प्रकार जनतेच्या पैशांवर चालणारा भ्रष्टाचार असल्याचे शिंदे सेनेचे म्हणणे आहे. या अनुषंगाने जनतेच्या प्रश्नांवरून कुणालाही पळवाट काढू दिली जाणार नाहीअशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे.

यामुळे शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट कामांवरून निर्माण झालेली असंतोषाची लाट आगामी स्थानिक निवडणुकांवर थेट परिणाम करू शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे. शिंदे सेनेकडून भ्रष्टाचारविरोधी मोहीम राबवली जात असल्याने ती भाजपसाठी राजकीय अडचण ठरू शकते. कारण पारोळा रोड, जुनी महानगरपालिका परिसर, कॉटन मार्केट, तसेच इतर भागांतील अनेक नागरिकांनी शिंदे सेनेच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. पक्षाचे जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते येत्या काही दिवसांत आणखी भ्रष्टाचार प्रकरणे उघड करण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘रस्ता भ्रष्टाचार’ हा मुद्दा राजकीय समीकरणांमध्ये परिणाम घडवू शकेल.

या आंदोलनात माजी महापौर भगवान करनकाळ, नरेंद्र परदेशी, भरत मोरे, आनंद जावडेकर, ॲड. भुषण पाटील, सुभाष मराठे, मुन्ना पठाण,महादू गवळी, शिवाजी शिरसाळे, निलेश कांजरेकर, चंद्रशेखर शिंदे, संजय बनसोडे, ईस्तियाक अन्सारी आदी अनेकांचा सहभाग होता.