धुळे – तालुक्यातील दोंदवाड गावातील शाळेत शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून शाळेत शिक्षकांची नियुक्ती करावी, केवळ पगार घेण्यासाठी येणार्या शिक्षिकेवर कारवाई करावी, अशी मागणी करत ठाकरे गटाचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या नेतृत्वात उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य आणि विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या आवरात आंदोलन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या आंदोलनात प्रा. पाटील यांच्यासह दोंदवाड ग्रामपंचायत सदस्य रवींद्र बिर्हाडे, उपसरपंच गंगुबाई माळी, माजी सरपंच संजय बनसोडे आदींसह विद्यार्थी सहभागी झाले होते. ग्रामपंचायत सदस्य बिराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोंदवाड शाळेत पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गात ७५ विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यासाठी तीन शिक्षकांची नेमणूक आहे. एक शिक्षक नेहमी प्रशासकीय कामासाठी जिल्हा परिषदेत किंवा शिक्षणाधिकारी कार्यालयात ये-जा करतात. एक शिक्षिका चार वर्षांपासून केवळ पगाराच्या तारखेला म्हणजेच दरमहा एक तारखेला येते. त्यामुळे शिकविण्यासाठी केवळ एकच शिक्षक असतात. शिक्षक नेमणुकीबाबत शिक्षणाधिकार्यांकडे देखील मागणी केली. परंतु, शिक्षणाधिकार्यांनी दिशाभूल केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आठ दिवसात शिक्षकांची नेमणूक करावी, गैरहजर शिक्षिकेवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी लोकांचे ऐकून घेत आठ दिवसात शाळेसाठी शिक्षक नेमणुकीचे आश्वासन दिले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhule zilla parishad school student agitation regarding education amy