जळगाव : जिल्ह्यातील पर्यटनाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासंदर्भात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्गरम्य स्थळांच्या विकासावर भर देण्यासह पर्यावरणीय पर्यटनाला (इको टुरिझम) चालना देण्याबाबत चर्चा झाली. पर्यटन स्थळांचे आकर्षक पद्धतीने संवर्धन करत असतानाच, त्याठिकाणी आधुनिक सुविधा निर्माण करणे, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यावर भर देण्याविषयी बैठकीत चर्चा झाली. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांचे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी प्रसिध्दी करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन संधी शोधण्याबाबतही विचारमंथन करण्यात आले. या प्रयत्नांद्वारे जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना नवीन उंची मिळावी. आणि जिल्हा पर्यटकांसाठी एक आकर्षक केंद्र म्हणून विकसित व्हावा, यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिले.

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आणि प्राचीन दगडी कोरीव बौद्ध स्मारकांसाठी जगप्रसिद्ध असलेली अजिंठा लेणी जळगावपासून जवळच आहे. त्याठिकाणी भेट देणारे पर्यटक जळगाव येथेच उतरतात. याशिवाय अमळनेरचे मंगळग्रह मंदिर, पद्मालयचा गणपती, पाटणादेवी, उनपदेव येथे असलेला उष्ण पाण्याचा झरा, सातपुड्यातील निसर्गरम्य वातावरणात वसलेली मनुदेवी, मुक्ताईनगरचे संत मुक्ताई मंदिर, तापीवरील हतनूर धरण, गारखेडा येथे वाघूर धरणाच्या बुडीत क्षेत्रात उभारलेले बेट, फरकांडे येथील झुलते मनोरे, जळगावमधील जैन मंदिरे, जैन हिल्सवरील गांधी तीर्थ, यावल वन्यजीव अभयारण्य अशी बरीच पर्यटन क्षेत्रे जिल्ह्यात आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: District collector ayush prasad led meeting to promote tourism development and eco tourism in jalgaon sud 02