जळगाव – शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आणि महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या भ्रमणध्वनीमध्ये आक्षेपार्ह छायाचित्रे आणि चित्रफिती आढळल्याचा आरोप रुपाली चाकणकर यांनी केला आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांनीही आता चाकणकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. जेवढे लक्ष त्या पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात देत आहेत, तेवढेच लक्ष त्या हनी ट्रॅप प्रकरणाकडे का देत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी घटनास्थळी दोन महिला उपस्थित होत्या. तपासादरम्यान खेवलकर यांच्या घरातून जप्त केलेल्या भ्रमणध्वनीमध्ये महिलांसोबतच्या चॅटचे स्क्रीनशॉट, नग्न आणि अर्धनग्न छायाचित्रे व काही अशोभनीय कृत्यांच्या चित्रफिती मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अनेक धक्कादायक आरोप करून वातावरण अधिकच तापवले आहे. त्यांनी यामध्ये महिलांचा गैरवापर, संशयास्पद संपर्क आणि इतर गंभीर बाबींचा उल्लेख करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आणि प्रांजल खेवलकर यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी जावयाची बाजू घेत चाकणकरांवर पलटवार केला आहे. तुम्ही ज्या पद्धतीने बोलता, ते पाहता जणू तुम्ही स्वतःच चौकशी अधिकारी आहात. तसेच गुन्हा सिद्ध झाल्यास आपण जावयाचे समर्थन करणार नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले आहे. मुक्ताईनगरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.

दुसरीकडे रूपाली चाकणकर यांना माझे सांगणे आहे, की जरा हनी ट्रॅप प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्याकडेही लक्ष घाला. नाशिकमध्ये पहिल्यांदा उघडकीस आलेल्या या प्रकरणात ७२ अधिकारी अडकले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. साताऱ्याचे दोन माजी मंत्री तसेच त्यांचा कोणी मुलगा त्यात गुंतलेला असताना त्यांच्याकडे चाकणकर यांनी लक्ष द्यावे. हगवणे हुंडाबळी प्रकरणात दुसऱ्याच दिवशी तुम्ही लक्ष घातले असते तर आम्हाला बरे वाटले असते. बीडला सुद्धा तुम्ही पोहोचला नाही. प्रांजल खेवलकर प्रकरणात रोहिणी खडसे यांचा संबंध असल्यामुळे तुम्ही लगेच धावून आलात, अशी टीका एकनाथ खडसे यांनी चाकणकर यांच्यावर केली आहे. पुणे पोलिसांनी जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर रेव्ह पार्टी करण्यासह ड्रग्ज बाळगल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी आरोपांची चौकशी आधी करावी. उगाच त्याच्याजवळ हे सापडले ते सापडले करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू नये, असे सुद्धा खडसे म्हणाले.