Jalgaon District Bank, Dagadi Bank / जळगाव – शहरातील दगडी बँकेची जुनी इमारत विकण्याचा निर्णय जिल्हा सहकारी बँकेने घेतल्यानंतर ज्येष्ठ संचालक आमदार एकनाथ खडसे यांनी त्यास तीव्र विरोध केला. प्रत्यक्षात, संचालक मंडळ आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर आता खडसे यांनी कमी किमतीत विकल्या जाणाऱ्या दगडी बँकेची किंमत सुमारे ६५ कोटी असू शकते, असा दावा करून खळबळ उडवून दिली आहे.
जिल्हा बँक संचालक मंडळाच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत दगडी बँकेच्या ब्रिटिशकालीन इमारत विक्रीचा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला. सरकारी नोंदणीकृत मूल्य निर्माता यांच्याकडून आलेल्या इमारतीच्या मूल्य अहवालाची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय सदर बैठकीत घण्यात आला.
दगडी बँकेची जुनी इमारत विकण्यासाठी ६५०० चौरस फूट चटई क्षेत्रासाठी सुमारे ४० हजार रुपये प्रति चौरस फूट दर निश्चित केला आहे. त्यानुसार संपूर्ण इमारतीचे एकूण मूल्य १२ कोटी आणि त्यावर अतिरिक्त १५ कोटी रूपये घेण्याचे संचालक मंडळाने यापूर्वीच ठरवले आहे. अटी-शर्ती टाकून जिल्हा बँकेने जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे संचालकांच्या बैठकीत ठरले.
जिल्हा बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता कुठल्याही प्रकारे स्वत:च्या मालमत्ता विकण्याची गरज नाही. त्यानंतरही दगडी बँकेच्या पुरातन इमारतीची विक्री करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्यास आपला विरोध असल्याचे खडसे यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते.
दरम्यान, बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी बैठकीनंतर जिल्हा बँकेत पत्रकारांशी बोलतांना खडसे यांच्यावर निशाणा साधला. गेल्या ३० वर्षांपासून ते बँकेचे संचालक आहेत आणि त्यांच्याच कार्यकाळात मधुकर सहकारी साखर कारखाना, जे. टी. महाजन सहकारी सूतगिरणी, रावेर सहकारी साखर कारखाना, बेलगंगा सहकारी साखर कारखाना या संस्था जिल्हा बँकेने विक्री केल्या. त्या संस्थांशी शेतकऱ्यांच्या भावना जोडलेल्या नव्हत्या का? तेव्हा त्यांनी आतासारखा विरोध का केला नाही ? असे प्रश्न पवार यांनी खडसेंना विचारले आहेत.
पवार यांना प्रत्युत्तर देताना खडसे यांनीही त्यावेळी संबंधित संस्था आणि कारखान्यांवर जिल्हा बँकेचे कर्ज होते. आणि ते कर्ज वसूल होत नसल्याने त्यांची विक्री करणे क्रमप्राप्त ठरले होते, असे स्पष्टीकरण दिले आहे. त्याच प्रमाणे जिल्हा बँकेने आता विक्रीला काढलेली दगडी बँकेची इमारत ही बँकेची स्वतःची मालमत्ता आहे.
शेजारील जागेच्या दरानुसार या मालमत्तेची किंमत किमान ६५ कोटी रूपये इतकी असू शकते. त्या इमारतीवर कुणाचे कर्ज नाही, एवढेही जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांना कळत नसावे का, पूर्वजांनी कमावलेली मालमत्ता सध्या आवश्यकता नसताना विक्रीचा अधिकार संचालक मंडळाला कुणी दिला, असेही प्रश्न खडसे यांनी उपस्थित केले आहेत.
राज्य सरकारने जिल्हा बँकेतील २२० कर्मचाऱ्यांची भरती करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, ही भरती प्रक्रिया पारदर्शक असावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. कोणत्याही प्रकारची शिफारस किंवा वशिलेबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा सुद्धा खडसे यांनी दिला आहे.