नाशिक : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २४ मधील गोविंदनगर, जुने सिडको, तिडकेनगर, खांडे मळा परिसरातील मतदार याद्यांमध्ये अनेक त्रुटी असून या त्रुटींमुळे महापालिका निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात येण्याची शक्यता असल्याने त्वरीत कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक प्रवीण (बंटी) तिदमे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
v
९१८८ मतदारांचे पत्तेच मतदार यादीत नाहीत. ४७३ मतदारांची नावे दोन ठिकाणी नोंदविण्यात आली आहेत. याशिवाय, नाशिक जिल्ह्यातील इतर १४ विधानसभा मतदारसंघांतील ३२८१ मतदारांची नावे प्रभाग २४ मध्ये दुबार नोंदली गेली आहेत. काही मतदारांच्या नावासमोर पुरुषांच्या ऐवजी महिलांचे फोटो किंवा एकाच फोटोचा दोन वेगवेगळ्या मतदारांसाठी वापर झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. ही गंभीर चूक केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणाची नाही, तर निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास डळमळीत करणारी आहे. वेगवेगळ्या नोंदी कायदेशीर गुन्हा आहेत. एका व्यक्तीची नोंद एकाहून अधिक ठिकाणी असणे किंवा बोगस माहिती देणे हे कायद्यानुसार दंडनीय , असल्याचे तिदमे यांनी नमूद केले.
देवळाली आणि नाशिक पूर्व मतदारसंघातील काही ग्रामपंचायतीतील मतदारांची नावे नाशिक पश्चिम मतदारसंघातही आहेत, ज्यामुळे हे मतदार दोन ठिकाणी मतदान करू शकतात. हा गुन्हा ठरतो, असे त्यांनी नमूद केले. बोगस व दुबार नावे टाळण्यासाठी सॉफ्टवेअरद्वारे डी-डुप्लीकेशन पडताळणी प्रणाली वापरण्यात यावी. , सदोष मतदार यादी तातडीने दुरुस्त करूनच महापालिका निवडणुकीसाठी वापरण्यात यावी, दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात यावी, केलेल्या कारवाईची माहिती लेखी स्वरूपात जाहीर करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. तिदमे यांनी पुराव्यांसह २१९ पृष्ठांची पत्तेविना मतदारांची यादी, २४ पृष्ठांची दुबार नावांची यादी, आणि १०६ पृष्ठांची १४ विधानसभा मतदारसंघांतील दुबार नावांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली.
