नाशिक – अतिवृष्टीमुळे द्राक्ष शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने निफाड तालुक्यातील उगाव येथील शेतकरी कैलास यादव पानगव्हाणे यांनी विषारी औषध प्राशन करत द्राक्षबागेत आत्महत्या केली.

पानगव्हाणे यांच्या द्राक्षबागेची ऑक्टोबर छाटणी करून अनेक दिवस झाले होते. पानगव्हाणे सकाळी द्राक्षबागेत गेले. वेलींना फुलोरा न दिसल्याने बँक व सावकाराचे कर्ज कसे फेडायचे आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, यामुळे हतबल होऊन द्राक्षबागेतच त्यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या पत्नीने पुतण्याला बोलावून घेतले. तोंडातुन फेस येत असल्याने ते शेतातच बेशुध्द झाले. घरातील सदस्यांनी त्यांना तातडीने निफाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांचे निधन झाले. याबाबत निफाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. पानगव्हाणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, भावजई असा परिवार आहे.