जळगाव : बीडमधील महाएल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर “विखे आला आणि महाराष्ट्रभर विखार पसरवून गेला. गेला तर गेला, पण जीआर काढला,” असे वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी विखे पाटील यांची बाजू घेतानाच जीआरचा निर्णय हा कोणा एकाचा नाही तर मंत्री समितीचा होता, असे बोलून भुजबळांना डिवचण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला आहे.
महायुती सरकारमध्ये नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेला अंतर्गत संघर्ष अजूनही मिटलेला नाही. सुरtवातीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे नाव पालकमंत्रीपदासाठी निश्चित झाले होते. मात्र, शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) विरोधामुळे पालकमंत्रीपदाचा निर्णय स्थगित ठेवावा लागला. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) वतीनेही त्या पदावर दावा सांगितला गेला.
या राजकीय तिढ्यामुळे नाशिकच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती अद्याप रखडलेली आहे. मित्र पक्षांच्या नाराजीमुळे काही क्षणापुरते पालकमंत्री ठरलेल्या गिरीश महाजन यांच्यावर देखील आता करा किंवा नका करू, पण एकदाचा निर्णय घ्या, असे म्हणण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, दादा भुसे यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे न्यावा लागेल, असे वक्तव्य केले आहे.
महायुती दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा वाद महायुतीच्या तीनही पक्षांच्या नेत्यांना मिटविता आलेला नाही. कोणा एकाची नियुक्ती केल्यास दोन पक्ष नाराज होतील, या भीतीने दोन्ही ठिकाणी पालकमंत्री नियुक्त न करण्याचेच धोरण सध्यातरी महायुतीच्या नेत्यांनी आखलेले दिसते. नाशिकच्या पालकमंत्रीपदाविषयी वरिष्ठ स्तरावर कोणत्याच हालचाली होत नसल्याने या पदासाठी इच्छुक असलेले राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तर पालकमंत्री नसल्याने कोणाचे काहीही अडत नाही, असेही सर्वांना काही दिवसांपूर्वी सुनावले होते.
एरवी छगन भुजबळ हे नाशिकचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने अधुनमधून मंत्री महाजन यांना छेडण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. त्यामुळे मंत्री भुजबळ यांनी बीडमधील महाएल्गार सभेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर तिखट टीका केल्यानंतर आता मंत्री महाजन यांनीही प्रतिक्रिया देत राधाकृष्ण विखे पाटलांची बाजू घेतली आहे. जीआर काढण्याचा निर्णय हा वैयक्तिक विखे पाटील यांचा नसून, मंत्री समितीचा सामूहिक निर्णय होता. त्यामुळे कोणालाही लक्ष्य करणे योग्य नाही, असे महाजन यांनी म्हटले आहे. विखे पाटील यांची बाजू घेतानाच भुजबळांना प्रत्युत्तर देण्याची संधी महाजन यांनी साधली, असली तरी त्यामागे नाशिकच्या पालकमंत्रीपदाचे दुखणे होतेच. हे राजकीय वर्तुळाच्या लक्षात आल्याशिवाय राहिले नाही.