जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी काहीअंशी स्थिर असलेल्या सोन्याच्या दराने सोमवारी सकाळी बाजार उघडताच मोठी उसळी घेतली. दसऱ्यापूर्वी सोन्याने केलेला नवा उच्चांक लक्षात घेता ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांना मोठा धक्का बसला.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आल्याने सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला आहे. जागतिक बाजारपेठेतील तेजी आणि रुपयाच्या सर्वकालीन निच्चांकी पातळीमुळे ही दरवाढ झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. एमसीएक्स एक्सचेंजवर सुद्धा सोन्याचा व्यवहार तेजीने सुरू आहे.
जागतिक अस्थिरतेमध्ये काही दिवसांपासून सोने आणि चांदी या दोन्ही धातुंच्या किमती सातत्याने वाढत आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता तसेच डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत सोमवारी देखील मोठी वाढ झाली.
गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किमती जवळपास ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. इक्विटी आणि रिअल इस्टेटसारख्या इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत सोन्यापासून मिळणाऱ्या परताव्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत सध्या प्रति औंस ३,८०० डॉलरपर्यंत आहे आणि आगामी काळात ती ४,८०० डॉलरपेक्षा अधिक होऊ शकते, असे सुवर्ण व्यवसायातील जाणकारांचे म्हणणे आहे. भारत देशात बहुतेक सोने आयात केले जात असल्याने सीमा शुल्क, जीएसटी आणि इतर स्थानिक कर सोन्याच्या किमतींवर परिणाम करतात.
जागतिक बाजारपेठेतील अशांतता जसे की युद्ध, आर्थिक मंदी किंवा व्याज दरातील बदल यांचा थेट परिणाम सुद्धा सोन्याच्या किमतींवर होतो. जेव्हा जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता वाढते तेव्हा गुंतवणूकदार स्टॉक किंवा इतर अस्थिर मालमत्तेऐवजी सोन्यासारखे सुरक्षित पर्याय निवडतात. त्याचीच प्रचिती सध्या येत असून, सोन्याचे दर हळहळू नवीन उंची गाठताना दिसत आहेत.
जळगावमध्ये शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख १७ हजार ३१७ रूपयांपर्यंत होते. शनिवारी जेमतेम १०३ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याचे दर एक लाख १७ हजार ४२० रूपयांपर्यंत पोहोचले. दरवाढीचा वेग मंदावल्याने ग्राहकांसह व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, सोमवारी सकाळी बाजार उघडताच सोन्याने पुन्हा दणका दिला.
शनिवारच्या तुलनेत तब्बल १९५७ रूपयांनी वाढ झाल्याने सोन्याने एक लाख १९ हजार ३७७ रूपयांपर्यंत मजल मारत नवा उच्चांक प्रस्थापित केला. दसऱ्यापूर्वी सोने एक लाख २० हजार रूपयांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचल्याने दिवाळीपर्यंत त्यात आणखी किती वाढ होते, त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.