नाशिक – शासकीय आश्रमशाळेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी भर पावसात काढलेल्या मोर्चामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. गणेशोत्सवासाठी खरेदीला निघालेल्या नागरिकांना मोर्चामुळे वाहतूक कोंडीत बराचवेळ अडकून पडावे लागले.

तपोवन परिसरातून जुना आडगाव नाकामार्गे काट्या मारूती चौक-पंचवटी कारंजा-रविवार कारंजा-अशोक स्तंभमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय आणि नंतर आदिवासी विकास भवनावर मोर्चा धडकला. मोर्चामुळे वाहतूक विभागाच्या वतीने कोंडी टाळण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. मोर्चा काट्या मारूती चौकाजवळ आल्यावर पुढील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्याप्रमाणे अहिल्याबाई होळकर पुलावर मोर्चा आल्यावर रविवार कारंजावरील वाहतूकक अन्य मार्गाने वळविण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यावर अन्य मार्गाने वाहतूक वळविण्यात आली. मात्र त्या वेळी शाळा सुटल्याने विद्यार्थ्यांची गर्दी आणि इतर गर्दी एक झाली. मोर्चा पावसामुळे नियोजित वेळेपेक्षा उशीराने सुरू झाला. मोर्चामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

जिल्हाधिकारी कार्यालय जाम

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यावर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन दिले. त्यामुळे अर्ध्या तासाहून अधिक वेळ मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या देऊन होते. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजीही केली. यावेळी खासदार भास्कर भगरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी आदिवासी विकास भवनाकडे कूच केले.

मोर्चेकऱ्यांच्या मागण्या

शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची १७९१ पदे बाह्यस्त्रोतद्वारे भरण्याचा आदेश तत्काळ रद्द करावा.

शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात कार्यरत वर्ग तीन आणि चार कर्मचारी यांना तत्काळ रोजंदारी, तासिका मानधन तत्वावर शाळेच्या पहिल्या दिवसापासून हजर करावे.

मध्यवर्ती स्वयंपाकघर योजना रद्द करुन पूर्वीप्रमाणे आश्रमशाळेत भोजन व्यवस्था सुरू करावी, यांसह इतर मागण्या करण्यात आल्या.