शहरातील आयनॉक्समध्ये मंगळवारी हर हर महादेव या चित्रपटाचे प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर शाखेतर्फे करण्यात आलेल्या विरोधामुळे स्थगित करण्यात आले. चित्रपटातील आक्षेपार्ह घटनांमुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आयनॉक्ससमोर आंदोलन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील ऐतिहासिक घटनांवर आधारित दिग्दर्शक व लेखक अभिजित देशपांडे यांचा हर हर महादेव हा चित्रपट राज्यभरात प्रदर्शित झाला आहे. शहरातील आयनॉक्स चित्रपटगृहात हर हर महादेव मंगळवारी प्रदर्शित होणार होता. तत्पूर्वी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांशी चर्चा करीत त्यांना चित्रपटातील आक्षेपार्ह घटनांची माहिती देत तो प्रदर्शित करू नका, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर शाखेच्या पदाधिकार्‍यांनी केली. चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांनी ही विनंती मान्य करीत चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार नाही, याबाबत आश्‍वास्त केले. मंगळवारी प्रेक्षकांना तिकिटांची रक्कमही परत करण्यात आली.

हेही वाचा >>> नाशिकमधील सिडको प्रशासकीय कार्यालय बंद करण्यावरुन शिंदे गट-भाजपमध्ये मतभेद

चित्रपटात दाखविण्यात आलेल्या अनेक घटना व छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. इतकेच नाही; तर छत्रपतींचे निष्ठावंत सरदार बांदल यांच्याविषयी चित्रपटात दाखविण्यात आलेले प्रसंग बदनामीकारक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज दस्तुरखुद्द छत्रपती संभाजीराजे यांनीही चित्रपटास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे जळगावमध्ये हा चित्रपट कुठेही प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, अशी आंदोलकांची भूमिका आहे. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनील माळी, अमोल कोल्हे, पुरुषोत्तम चौधरी, इब्राहिम तडवी, रिंकू चौधरी, किरण राजपूत, अनिल पवार, उज्ज्वल पाटील, साजीद पठाण, प्रमोद पाटील, कुंदन सूर्यवंशी, राहुल टोके, हितेश जावळे, भीमराव सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Har har mahadev movie show postponed due to ncp workers protest zws