धुळे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा काँग्रेसने संघटनात्मक तयारीला गती दिली आहे. काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांची एकजूट वाढवून आगामी निवडणुकांमध्ये मजबूत कामगिरी करण्याचा संकल्प केला असून, यासाठी धुळे येथे जिल्हा आढावा बैठक पार पडली.

ही बैठक काँग्रेस भवनमध्ये ७ नोव्हेंबर रोजी दुपारी सुरू झाली आणि सायंकाळी उशीरापर्यंत चालली. या बैठकीला खासदार डॉ. शोभा बच्छाव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे, शहराध्यक्ष हाजी साबीर शेठ खान, साक्री विधानसभा निरीक्षक भरत टाकेकर, धुळे ग्रामीण निरीक्षक राजाराम पानगव्हाणे, धुळे शहर प्रभारी जावेद फारूकी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी विधानसभा स्तरावर निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. साक्री विधानसभा मतदार संघासाठी भरत टाकेकर तर धुळे ग्रामीणसाठी राजाराम पानगव्हाणे, धुळे शहरासाठी जावेद फारूकी, शिंदखेडा विधानसभा मतदार संघासाठी धनंजय चौधरी आणि शिरपूर विधानसभा मतदार संघासाठी रमेश कहानडोळे यांची नेमणूक करत आली आहे. या निरीक्षकांना संबंधित मतदारसंघांतील कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, संभाव्य उमेदवारांची यादी तयार करणे आणि पक्ष संघटन अधिक सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पुढील आठ दिवसांत मंडळ प्रमुखांची नियुक्ती करून ग्रामस्तरावर व प्रभागनिहाय रचना उभी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच निरीक्षकांनी मतदारसंघातील राजकीय आणि अराजकीय प्रतिष्ठित व्यक्तींशी संवाद साधून पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, गटबाजी दूर करून एकजूट निर्माण करावी, असे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत.

काँग्रेसच्या या हालचालींमुळे धुळे जिल्ह्यातील निवडणुकीच्या समीकरणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, राजकीय चुरस अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने उमेदवार चाचपणी प्रक्रिया वेगवान केली आहे. धुळे शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शिंदखेडा विधानसभा प्रभारी जावेद फारूकी आणि शिरपूर प्रभारी रमेश कहानडोळे यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. शहरासह ग्रामीण भागातील उमेदवारांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या बैठकीत मतदारसंघनिहाय आढावा घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पक्षाने आगामी निवडणुकांमध्ये प्रत्येक ठिकाणी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असून, “लढू आणि जिंकू” या घोषवाक्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचे दिसले. बैठकीदरम्यान धुळे महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. शहरातील महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून, १९ प्रभागांमधून सुमारे १५० इच्छुक तर ग्रामीण भागातील दोनशेहून अधिक उमेदवारांनी मुलाखती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

बैठकीत काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश श्रीखंडे, माजी नगरसेवक मुझफ्फर हुसेन, दोस्त महमंद, गायत्री जयस्वाल, बानूबाई शिरसाठ, हाजी इस्माईल पठाण, गुलाब कोतेकर, रितेश पाटील, राजेंद्र खैरनार, जावेद सिद्दीकी, तसेच उपस्थित होते. काँग्रेस पक्षाच्या या संघटनात्मक तयारीमुळे धुळे जिल्ह्यातील निवडणुकीच्या समीकरणात बदल घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.