धुळे : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जवळपास ५० हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झालेच, पण ऑक्टोबर अखेरचा पाऊस आणि यामुळे बदलेले वातावरणही आता रब्बी पिकाच्या मुळावर उठले आहे.

ऑक्टोबर अखेर झालेल्या पावसामुळे तयार झालेल्या वातावरातील बदलाचा आता रब्बी पिकांना फटका बसण्याचा धोका जाणकारांसह कृषी खात्यानेही व्यक्त केला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आधीच शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यामुळे आर्थिक मदत मिळण्याची आशा लागून बसलेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्याप पूर्ण मदत मिळालेलीच नाही. अशातच ऑक्टोबरच्या अखेरीसही पावसाने चौफेर धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर घातली आहे.

जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कृषी आणि महसूल विभागाच्या पथकातर्फे पंचनाम्याचे काम सुरू आहे. यातून खरीप हंगामाची झालेली दैना अधोरेखित होऊ लागली असून कुठलाही अंदाज नसलेले सातत्याने बदलणारे वातावरण आता संभाव्य गंभीर परिस्थितीची जाणीव करून देणारे ठरू लागले आहे. कारण खरीप पिका नंतर आता रब्बी हंगामही वातावरणातील बदलांचा जणू शिकार झाला आहे. धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये कापसासह मका आणि कांदा पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याचे कृषि खात्याने दिलेल्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत वाटपाचा उपक्रम प्रशासनाने सुरू केला आहे. जिल्ह्यातील एकूण १६ हजार २०० शेतकऱ्यांपैकी ११ हजार ८८२ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या डीबीटी पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. या शेतकऱ्यांना आठ कोटी १५ लाख ८६ हजार रुपयांचा निधी वाटप करण्यात येणार आहे. यापैकी चार हजार ५०५ शेतकऱ्यांना तीन कोटी ९२ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच मदत देण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे यांनी सांगितले. मात्र, सप्टेंबरमधील अतिवृष्टीची मदत मिळण्याची प्रक्रिया सुरू असतानाच ऑक्टोबरमधील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मिळणारी मदत अपुरी ठरली आहे. यामुळे मदतमिळण्याची अनेक शेतकऱ्यांना आशा आहे. वारंवार होणाऱ्या हवामानातील बदलामुळे खरीप तसेच रब्बी असे दोन्हीही हंगाम धोक्यात येत असल्याने बदलत्या वातावरणातही तग धरलेल्या शेकडो शेतकऱ्यांचे मनोधैर्य आता खचले आहे.यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत.

काल दुपारनंतर जिल्ह्यातील बहुतेक भागात मुसळधार आणि जोरदार पाऊस झाल्याने गल्लीबोळातून पाण्याचे लोंढे वाहू लागले. यामुळे अनेकांची तारांबळ उडाली वादळ वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.