जळगाव – दोन हजार रूपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त असलेले केळीचे दर १२०० रूपयांपर्यंत घसरल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या आठवड्यात मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. दरम्यान, पावसाचा जोर कमी होऊन नवरात्रोत्सवाचे वेध लागल्यानंतर केळीच्या दरात आता क्विंटलमागे ४०० रूपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

बर्‍हाणपूर बाजार समितीत १२ ऑगस्टपर्यंत केळीला प्रतिक्विंटल १८२५ रुपयांचा दर मिळत होता. मात्र, त्यानंतर अचानक व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन भाव पाडण्यास सुरूवात केली. कधी १५००, कधी १३०० तर कधी १२००, असा मनमानी भाव आकारून व्यापाऱ्यांकडून खेळ करण्यात आला. शेतकऱ्यांची अपेक्षा होती की किमान बाजार समितीच्या फलकावर जाहीर झालेल्या दरानुसार तरी खरेदी व्हावी. पण प्रत्यक्षात शेतातूनच केळी काढणी करताना व्यापाऱ्यांनी आणखी कमी भाव लावला. परिणामी, शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल तब्बल ५०० ते ६०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. तशात दर पाडल्यानंतरही व्यापारी मुद्दाम काढणीसाठी टाळाटाळ करत असल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांत तीव्र नाराजी पसरली होती.

अशा या परिस्थितीत, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील एकही मंत्री, खासदार किंवा आमदार पुढे आला नाही. त्यावर ‘लोकसत्ता’ने प्रकाश झोत टाकल्यानंतर अखेर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेण्यात आली. त्यात मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरचे जिल्हाधिकारी हर्ष सिंग यांनीही दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. सदर बैठकीत केळी लिलाव प्रक्रियेवर यापुढे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवण्यासह लिलावांचे यूट्यूब लिंकद्वारे थेट प्रसारण करण्याचे ठरले. तसेच केळीचे बोर्ड भाव जाहीर करताना कमीत कमी २० केळी भाव किमतीची सरासरी काढून बोर्ड भाव जाहीर करण्याचे आणि बाजार समितीच्या बाहेर होणाऱ्या अनधिकृत खरेदी-विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी चेक पोस्ट स्थापन करण्यावर एकमत झाले. प्रत्यक्षात, त्याविषयीची कार्यवाही लगेच सुरू झाली नाही.

दरम्यान, केळीचे दर घसरण्यास कारणीभूत ठरलेल्या काही कारणांपैकी एक असलेले पावसाळी वातावरण आता बऱ्यापैकी निवळले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊन उत्तर भारतात केळी पाठविण्याची प्रक्रिया देखील सुलभ झाली आहे. दुसरीकडे, नवरात्रोत्सव दहा दिवसांवर आल्यामुळे केळीच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. यामुळे आठ दिवसांपूर्वी ११५१ रूपयांपर्यंत खाली आलेले केळीचे दर गुरूवारी १६३६ रूपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले. या कारणाने मोठ्या दर प्रमाणात घसरल्याने काही दिवसांपासून आर्थिक नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.