नाशिक – शिक्षण क्षेत्रात सध्या अनेक घडामोडी घडत असून महाराष्ट्रीतील शिक्षकांच्या डोक्यावर टीईटी परीक्षेचे ओझे (शिक्षक पात्रता परीक्षा) असताना शिक्षण क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी काही संधीही उपलब्ध आहेत. यासंदर्भात नाशिक जिल्ह्यातील कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

शैक्षणिक क्षेत्रात विशेषत: प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांसाठी दिवाळीच्या सुट्टींचे एक आकर्षण असते. आगामी दिवाळी सुट्टीत काय करायचे, याचे नियोजन वर्षभरापूर्वीच काही जणांनी करुन ठेवलेले असते. परंतु, सर्व ठरविलेले नियोजन पूर्णत्वास जाईलच, याची खात्री नसते. यंदा शिक्षकवर्गाच्या दिवाळीच्या आनंदावर टीईटी परीक्षेमुळे विरजन पडले. या परीक्षेच्या तयारीचा तणाव शिक्षकांवर स्पष्टपणे दिसून आला.

महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते आठवी वर्गांवर नियुक्ती असलेल्या शिक्षकांना टीईटी (टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट) म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा देणे अनिवार्य झाले आहे. टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शिक्षकांना अभ्यास करावा लागला. दिवाळीच्या सुट्टींमध्ये पर्यटनासाठी बाहेर जाण्याचे मनसुबे गुंडाळून ठेवत शिक्षकवर्ग अभ्यासात गुंतला आहे.

महाराष्ट्रातील शिक्षकवर्गाची ही अवस्था असताना आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) त्यांच्या शिक्षकांसाठी सीटीईटी परीक्षा जाहीर केली आहे. ही परीक्षा पुढील वर्षी आठ फेब्रुवारी रोजी देशभरातील १३२ शहरांमध्ये होणार आहे. सीबीएसई मंडळातंर्गत कार्यरत शिक्षक वर्गाला आता या परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. नोव्हेंबरपासून लगीनसराई सुरु होत असल्याने अनेक शिक्षकांच्या घरातही मंगलकार्याची धूम असते. परंतु, आता टीईटी आणि सीटीईटी परीक्षांच्या दबावामुळे शिक्षक कात्रीत सापडले आहेत.

दुसरीकडे, शिक्षण क्षेत्रात नव्याने प्रवेश करु इच्छिणाऱ्यांना काही संधीही उपलब्ध झाल्या आहेत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण, जिल्हा नाशिक यांच्या अधिनस्थ असलेल्या शासकीय आश्रमशाळेत शिक्षकांची काही रिक्त पदे आहेत. ही पदे काही दिवसांपासून भरली न गेल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. आता ही रिक्त पदे नाशिक येथील मे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था या बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत भरण्यात येणार आहेत.

पात्र उमदेवारांनी संस्थेच्या https://scmltd.com या संकेतस्थळावर अर्ज सादर करावयाचे आहेत. त्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतच मुदत असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदवासी विकास प्रकल्प कळवणचे प्रकल्प अधिकारी नरेश अकुनूरी यांनी दिली आहे. शैक्षणिक क्षेत्रात शिकविण्यासाठी येऊ इच्छिणाऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्याची गरज आहे.