नंदुरबार : धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण देण्याचा प्रश्नच नाही. धनगरांना आदिवासींप्रमाणे स्वतंत्र आरक्षण देवू, मात्र आदिवासी आरक्षणात त्यांना हिस्सा न देण्याची शासनाची भूमिका आहे, असे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे पाच ऑक्टोबर रोजी आदिवासी संघटनांकडून रेल रोकोची हाक देण्यात आली आहे. धनगरांना आदिवासी समाजात आरक्षणाच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा नंदुरबारमध्ये राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणी आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे, या प्रकरणी जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. नंदुरबार येथे आदिवासी संघटनांची बैठक झाली. बैठकीत धनगरांना आदिवासी समाजात आरक्षण आणि सुविधा देण्यास विरोध करण्यात आला. त्यासंदर्भात पाच ऑक्टोबरला आदिवासी समाजाकडून रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. धनगरांना स्वतंत्र आरक्षण द्या, त्याला आमचा विरोध नाही. परंतु, धनगरांना आदिवासींमधून कोणतीही योजना देण्यास विरोध असल्याचे यावेळी स्पष्ट करणात आले.

हेही वाचा : नाशिक : विसर्जन मिरवणूक वेळेत सुरु करण्याची सूचना; पोलीस-गणेशोत्सव मंडळ बैठक

सर्व राजकारण्यांनी राजकारण बाजूला सारून आंदोलनात एकत्र येण्याची गरज व्यक्त करण्यात आली. ज्यांना आदिवासी संघटनांच्या व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली विरोध करायचा नसेल त्यांनी वेगळे आंदोलन करावे, मात्र धनगरांना आदिवासी समाजामध्ये कदापि सामावून घेऊ नये, अशी भूमिका यावेळी समाज बांधवांनी मांडली. आदिवासी संघटनांच्या बैठकीत आमदार आमश्या पाडवी, माजी मंत्री पदमाकर वळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, सिताराम पावरा, मालती वळवी, वहारू सोनवणे, डॉ. भरत वळवी आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nandurbar minister for tribal development dr vijaykumar gavit gives assurance dhangars not added in tribals reservation css