नाशिक: महागड्या दुचाकी चोरणारे दोन जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकले असून त्यांच्याकडून चोरीच्या २० दुचाकी जप्त करण्यात आल्या. नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी आढावा घेत कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या पथकाने अतिदुर्गम भागांमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतले, इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरातील चोरीच्या दुचाकींचा शोध घेत असताना पृथ्वीराज जंगम (१९, रा. घोटी) याला ताब्यात घेतले.

हेही वाचा : नाशिक महापालिकेच्या संशयास्पद भूसंपादनाच्या चौकशीचे आदेश, भाजप आमदाराकडून तक्रार

त्याने मित्रांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना राजेश मोहरे (२५, रा.पुणे) याला सापळा रचत म्हाळुंगे औद्योगिक वसाहत परिसरातून ताब्यात घेतले. दोघांनी अन्य दोन विधीसंघर्षित बालकांच्या मदतीने नाशिक जिल्ह्यातील घोटी, इगतपुरी, वाडीवऱ्हे, सिन्नर, ठाणे जिल्ह्यातील शहापूर, खडकपाडा आणि पुणे येथील आंबेठाण, म्हाळुंगे औद्योगिक वसाहत परिसर, आळेफाटा, मंचर या ठिकाणांवरून महागड्या दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी २० चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या असून १४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघा संशयितांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.