नाशिक : देवळा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर न झाल्याने निषेधार्थ शनिवारपासून देवळा येथे काँग्रेसच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे . ठाकरे गटानेही देवळ्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील ४२ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून त्यात चांदवड, देवळा तालुक्यांचा समावेश नाही. देवळा तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने भीषण टंचाई निर्माण झाली आहे. खरीप हंगाम पूर्ण वाया गेल्याने शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला असून, मजुरांना काम नाही..यामुळे देवळा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा, अशा मागणीचे निवेदन तालुका काँग्रेस समितीच्या वतीने यापूर्वी प्रशासनाला देण्यात आले होते.

हेही वाचा : दिवाळीमुळे वाहतूक मार्गात बदल

त्यानंतरही शासनाकडून देवळा तालुका दुष्काळी जाहीर करण्यात आला नाही. याच्या निषेधार्थ देवळा तालुका काँग्रेस समितीच्या वतीने शनिवारी देवळ्यातील पाचकंदील भागात अन्नत्याग आमरण उपोषण करण्यात येणार आहे. पुढील पेचप्रसंगास शासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे. शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत देवळ्याचा समावेश न केल्याने ठाकरे गटाच्या वतीनेहू निषेध करण्यात आला असून देवळा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा, या मागणीचे निवेदन तहसीलदार विजय सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना देण्यात आले आहे.

हेही वाचा : नाशिक: परिवर्त मराठी साहित्य परिषदेची तयारी पूर्ण

तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाळ्यात देखील टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. त्यात अधिक भर पडण्याची शक्यता असल्याचे ठाकरे गटाने निवेदनात म्हटले आहे. राज्य शासनाने जिल्ह्यातील मालेगाव, येवला आणि सिन्नर हे तीन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. देवळ्यात या तालुक्यांपेक्षाही भयावह परिस्थिती असून तालुक्यातील बहुसंख्य गावात दिवसाआड तर काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला असून पशुपालक मिळेल तेथून व मिळेल त्या किमतीत चारा विकत घेत आहेत. प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन देवळा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देताना शहरप्रमुख विश्वनाथ गुंजाळ, जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय जगताप, उपतालुका प्रमुख विलास शिंदे, तालुका संघटक प्रशांत शेवाळे आदी उपस्थित होते.