नाशिक – लहान विक्रेते, फेरीवाल्यांना त्रासदायक अतिक्रमण निर्मूलन मोहीम न थांबविल्यास लोकशाही मार्गाने रस्त्यावरची लढाई सुरू करावी लागेल, असा इशारा देत श्रमशक्ती हॉकर्स सेलच्या वतीने मंगळवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले.
डॉ. वसंत ठाकूर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. महानगरपालिकेकडून फेरीवाल्यांविरुध्द मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू असून मोहीम त्वरित थांबवून सर्वप्रथम हॉकर्स, फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, राष्ट्रीय फेरीवाला धोरण २०१४ कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच महानगरपालिकेला श्रमशक्ती कामगार संघटनाप्रणित श्रमशक्ती हॉकर्स सेलकडून वारंवार निवेदन दिल्यानंतरही महानगरपालिकेकडून निवेदनाची कुठलीही दखल घेण्यात येत नसल्याने लोकशाही मार्गाने संघटनेच्या वतीने महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी डॉ.वसंत ठाकूर यांनी, पंधरा दिवसात आमच्या मागण्या मान्य न केल्यास लोकशाही मार्गाने रस्त्यावरची लढाई सुरू करण्यात येईल, असा इशारा दिला. राष्ट्रीय फेरीवाला धोरण २०१४ च्या कायद्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी, शहरातील हॉकर्स, फेरीवाल्यांविरुध्द सुरू असलेली कारवाई थांबवावी, मुख्य बाजारपेठेमध्ये हॉकर्स झोन देण्यात यावे, नव्याने बायोमेट्रिक नोंदणी सुरू करण्यात यावी, शहर पथविक्रेता समिती सदस्यांची बैठक त्वरित घेण्यात यावी, २०२४ मध्ये शहर पथविक्रेता समिती सदस्यांच्या निवडणुकीमध्ये गहाळ झालेल्या पथविक्रेत्यांची नावे यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावी. अपंग हॉकर्स फेरीवाल्यांच्या हातगाड्या, टपऱ्या उचलू नयेत, नोंदणीकृत हॉकर्स यांना नोंदणी प्रमाणपत्र ओळखपत्र त्वरित देण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष दाते, अक्षय परदेशी, दस्तगीरबाबा शेख आदी उपस्थित होते. हॉकर्स, फेरीवाल्यांच्या हक्कासाठी आंदोलन असल्याने मेनरोड, शिवाजी रोड, शालिमार, सरस्वती लेन, दहीपूल या भागांमधील सर्व फेरीवाल्यांनी दुकाने बंद ठेवली.
