नाशिक – हिंदू संस्कृतीनुसार चातुर्मासाला सुरूवात झाली असून या काळात व्रत, वैकल्य यांना अधिक महत्व आहे. या अनुषंगाने पूजेत फुलांना महत्वपूर्ण स्थान आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने विश्रांतीनंतर पुन्हा दमदार आगमन केले असून सतत पडणाऱ्या पावसामुळे फुलांचे दर सध्या वाढल्याने मागणीवर परिणाम झाला आहे.

चातुर्मासात व्रत, वैकल्य, सण अधिक असतात. कोणत्याही पूजेसाठी झेंडु, गुलाब, मोगरा, जास्वंद, निशीगंध या फुलांना विशेष मागणी असते. याशिवाय बेलपत्र, तुलसीपत्र, शमीपत्र, दुर्वा याची मागणी वाढते. सततच्या पावसामुळे यंदा फुलांचा दरवळ कमी आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये फुलांची शेती केली जाते. नाशिक, मुंबईसह शेजारील राज्यांमध्येही फुले पाठवली जातात. यंदा मात्र सततच्या पावसामुळे फुलांची आवक कमी झाली आहे. याचा परिणाम दरवाढीत झाला आहे.

सहसा १० रुपयांना मिळणारा फुलांच्या वाट्याची २० रुपयांना विक्री होत आहे. याविषयी विश्वकर्मा फ्लोअरचे भूषण गायकवाड यांनी माहिती दिली. संततधारेमुळे शेतांमध्ये पाणी झाले आहे. या पाण्यामुळे फुलांचे नुकसान होत असून कमी उत्पादनाचा परिणाम दरावर होत आहे. तसेच आषाढी एकादशी, गुरूपौर्णिमाला फुलांची मागणी अधिक राहत असल्याने दर वाढले आहेत. ऑरेंज कलकत्ता ५०० ते ५५० रुपये जाळी (क्रेट), झेंडु ऑरेंज ५०० ते ५५०, पिवळा झेंडु ६०० रुपये जाळी, शेवंती १५० ते २०० रुपये किलो, मोगरा ८०० ते १००० रुपये किलो, निशीगंध २०० ते २५० रुपये किलो, लाल गुलाब (साधा) ३० ते ४० रुपये डझन, लाल गुलाब (पॉलिहाऊस) १५० ते १८० रुपयांना २० नग, लिली १० ते १५ रुपये गुच्छ या दराने विक्री होत आहे. याशिवाय बेल ७० ते ८० रुपयांना १०८ तसेच तुळशीपत्र हे १०० ते १५० रुपये किलो असे दर आहेत.