नाशिक – मतदार यादीतील कथित घोळ आणि मत चोरीच्या विरोधात एक नोव्हेंबर रोजी मुंबईत काढण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चाची तयारी स्थानिक पातळीवर सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाविरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसेने शहर आणि ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीत मतचोरी कशी होते, बनावट मतदार नोंदणी याबाबत मार्गदर्शन केले. तर काँग्रेसतर्फे बुधवारी नाशिकरोड येथे ‘वोट चोर-गद्दी छोड’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाविरोधात एक नोव्हेंबरला मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा सर्वपक्षीय विरोधकांनी केली आहे. निवडणूक आयोग विरोधकांचे आक्षेप गांभिर्याने घेत नाही. घुसखोर मतदारांना यादीतून बाहेर काढणे, ही लोकशाहीची गरज आहे. निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविरोधात मोर्चा काढला जाईल. जिल्ह्याजिल्ह्यातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक मुंबईत येतील, असे विरोधकांनी म्हटले आहे.
मुंबईतील या मोर्चाच्या तयारीसाठी सर्वपक्षीय विरोधकांनी स्थानिक पातळीवर तयारी सुरू केली आहे. मोर्चाच्या तयारीसाठी रविवारी मनसेच्या येथील राजगड कार्यालयात शहर व ग्रामीणची बैठक झाली. यावेळी प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी मार्गदर्शन केले. निवडणुकीत कशा प्रकारे मत चोरी होते. मतदार यादीतील घोळ तसेच सत्ताधाऱ्यांकडून बनावट मतदार नोंदणी याबाबत त्यांनी माहिती दिली. मतचोरी विरोधात सर्वपक्षीय मोर्चात सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी मोर्चाच्या नियोजनासंदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे, जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील, संतोष पिल्ले, शहर समन्वयक भाऊसाहेब निमसे, संदीप किरवे आदी उपस्थित होते.
काँग्रेसतर्फे ‘वोट चोर-गद्दी छोड’ कार्यक्रम
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसने कथित मतचोरीच्या विषयावर कार्यक्रम हाती घेतला आहे. बुधवारी नाशिकरोड येथे होणाऱ्या ‘वोट चोर ,गद्दी छोड’ कार्यक्रमाची रूपरेषा आणि संघटन बळकटीसाठी अधिक प्रयत्न करून नाशिकरोडमध्ये काँग्रेस पक्षाला वैभव प्राप्त करण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याची आवश्यकता काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी मांडली.
नाशिकरोड ब्लॉक काँग्रेस कमिटीची आढावा बैठक हॉटेल शाही परिवार येथे शहर अध्यक्ष आकाश छाजेड आणि प्रदेश सचिव राहुल दिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. दिवे यांनी आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी मतदान केंद्र स्तरावर काम करून मतदार याद्या घरोघरी जाऊन तपासल्या पाहिजेत. प्रत्येक प्रभागात इच्छुकांनी आजपासूनच ताकतीने कामाला सुरुवात करावी, काम करणाऱ्यांना पक्ष न्याय देईल, असे आश्वासन दिले. यावेळी नाशिकरोड ब्लॉक काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष किरण जाधव, जावेद इब्राहिम, जावेद पठाण, कुसुमताई चव्हाण, अनिल बहोत,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष हिरे आदी उपस्थित होते.
