नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीकडून जलवाहिनीशी संबंधित कामांमुळे शनिवारी शहरातील बारा बंगला, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर आणि नाशिकरोड या पाच जलशुध्दीकरण केंद्रावरून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. रविवारी उपरोक्त भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. याबाबतची माहिती महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली. स्मार्ट सिटी कंपनीमार्फत शुक्रवारी बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र येथे वाहिनीत जोडणी केली जाणार आहे. तसेच ६०० मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीची जोडणी करण्याचे नियोजन आहे. या कामांसाठी गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथून एका बाजूची पाणी उचलण्याची व्यवस्था बंद ठेवावी लागणार आहे. त्यामुळे धरणातून बारा बंगला, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर आणि नाशिकरोड या पाच जलशुध्दीकरण केंद्रात पाणी पुरवठा होणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पाच केंद्रातून ज्या भागात पाणी पुरवठा होतो, तिथे शनिवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यात बारा बंगला, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर व नाशिकरोड परिसराचा समावेश आहे. या भागात रविवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे महानगरपालिकेने म्हटले आहे. अनेक भागात पाणी पुरवठा बंद राहणार असला तरी सातपूर, सिडको अशा काही भागात पाणी पुरवठा नेहमीप्रमाणे सुरळीत राहणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : समृद्धी महामार्गाचा आणखी एक टप्पा सोमवारपासून सेवेत, आता इगतपुरीपासून थेट…

प्रभाग कोणते ?

नाशिक पुर्व विभागातील प्रभाग क्रमांक १४ व १५ चा काही भाग, प्रभाग १६, २३ संपूर्ण. नाशिक पश्चिम विभागात प्रभाग क्रमांक सात व १२ चा काही भाग, तर १३ संपुर्ण , पंचवटी विभागातील सर्व प्रभाग. म्हणजे प्रभाग क्रमांक एक ते सहा अशा सहा प्रभागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नाशिकरोड विभागात देखील सर्व प्रभागात पाणी पुरवठा बंद असेल. यात १७, १८,१९, २०, २१ व २२ या प्रभागांचा समावेश आहे. नविन नाशिक विभागातील प्रभाग २४, २५, २८ व २९ मधील काही भागाचा समावेश आहे. यात हेडगेवार चौक, दत्त मंदीर, पवननगर, शुभम पार्क, रामेश्वरनगर, बनदवणेनगर, महेश बँक, रायगड चौक, लोकमान्यनगर, तोरणानगर, आदर्शनगर, गणपती मंदिर, पवननगर भागात सकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. तर शुभम पार्क , राजरत्ननगर, महाकाली चौक, मर्चंट बँक, उंटवाडी विभाग , तिडकेनगर, जगतापनगर, कालिका पार्क या भागात दुपारचा पाणी पुरवठा होणार नाही.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik no water supply on saturday due to smart city company s pipeline related works css