नाशिक : आमच्या मागण्यांसाठी कधी मुंबई तर कधी दिल्ली गाठावी लागते. मागण्या मान्य झाल्या असं म्हणतात, पण लेखी कागद काय कोणी देत नाही. तसा कागद मिळेपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. घरी लहान मुले कशी राहात असतील, हा प्रश्न सतावत असला तरी त्यांच्या भवितव्यासाठी आंदोलन सुरूच ठेवू, असा निर्धार सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडलेल्या शेतकरी, शेतमजूर आंदोलक महिलांनी व्यक्त केला. आंदोलकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्तांनी आंदोलनस्थळी भेट देत चर्चा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वन हक्क जमिनी, वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, यासह अन्य काही मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून माकप आणि किसान सभा यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. महिला आंदोलकांची संख्या लक्षणीय आहे. या आंदोलनामुळे मागण्या मान्य होतील, असा विश्वास त्यांना आहे. ललिता गवळी यांनी आपली व्यथा मांडली. सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. मुले घरी आणि मी इथं आहे. शेतात राबून पैसा कमावला. तो पोरांच्या शिक्षणासाठी लावला. पण, त्यांना नोकरी कुठे आहे ? शेती करू तर शेतजमीन ताब्यात नाही. करावं तर काय करावं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आम्ही गावातून खूप बायका आलो आहोत. कधी हॉटेलमध्ये तर कधी इथेच काही तरी खाऊन घेत आहोत. काही वेळा गावातला एखादा भाडे खर्च करून गावाकडे जातो आणि दोन दिवसांच्या पोळ्या, चटण्या घेऊन येत आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : “मोदी द्वेष हेच महाविकास आघाडीचे सूत्र”, प्रवीण दरेकर यांची टीका

जपाबाई माळी यांनी, उन्हामुळे तसेच जेवणाच्या वेळा बदलल्या गेल्याने उलट्या, जुलाबचा त्रास होत असल्याचे सांगितले. सरकार आमच्या मागण्या मान्य करेपर्यंत आम्ही इथून हटत नाही. माझ्या गावाकडे काल पाऊस झाला. तान्ह्या नाती डोंगर कडाखाली झोपडीत आहेत. त्यांचं काय झालं असेल, या विचाराने जीव कासावीस होत आहे. सरकार घरकुल योजनेत घरे मंजुर करत नाही. विधवा पेन्शनचा अर्ज मागितला तर संपला, असे सांगते. काय उपयोग सरकारचा, असा प्रश्न उपस्थित करुन एवढे आंदोलन सुरू असतांनाही सरकार आमच्यासाठी काहीच करत नाही, अशी अगतिकता मांडली.

हेही वाचा : कोणता समाज, घटक नाराज आहे ? दिंडोरी लोकसभेसाठी भाजप निरीक्षकांकडून चाचपणी

दरम्यान, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आंदोलनस्थळी भेट देत या ठिकाणी पाणी, स्वच्छतागृह यासह अन्य काही सोयी सुविधा आहेत काय, याची पाहणी केली. आंदोलकांशी चर्चा करत कायदा व सुव्यवस्था पाळण्याचे आवाहन केले. आंदोलनाचे नेते, माजी आमदारा जे. पी. गावित यांनीही आंदोलकांना प्रशासनाकडून पिण्याचे पाणी, नैसर्गिक विधीसाठी आवश्यक सुविधा दिल्या जात नसल्याची तक्रार केली. याबाबत वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवा, अशी सूचना केली. सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार असल्याचे गावित यांनी सांगितले. पालकमंत्री दादा भुसे यांनी आंदोलकांना पिण्याचे पाणी, शौचालय तसेच आरोग्य यंत्रणा सक्रिय ठेवण्याच्या सूचना दिल्या.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik police commissioner discuss with cpi m protesters and farmers css
First published on: 01-03-2024 at 15:29 IST