नाशिक – डोंगरप्रेमी, साहसप्रेमी, निसर्गप्रेमींची पिढी घडवणाऱ्या येथील वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेचा ४० वा वर्धापनदिन यंदा संस्थेच्या गुणवंतांच्या सत्काराने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त इंडियन माउंटन फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता कुसुमाग्रज स्मारकात हा समारंभ होणार आहे. यानिमित्त डोंगरप्रेमींना भारतीय साहस जगतातील पुरस्कारप्राप्त लघुपट पाहण्याची संधी मिळणार आहे, वर्धापनदिनानिमित्त हा लघुपट महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे.

१० सप्टेंबर १९८५ या दिवशी वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेची स्थापना काही गिरीदुर्ग प्रेमींनी एकत्र येऊन केली. तेव्हांपासून लोकांना सातत्याने डोंगरयात्रा घडविण्याचे अखंड कार्य वैनतेयकडून केले जात आहे. त्यामुळे दुर्ग खजिना पाहण्याची आणि त्याविषयी जाणून घेण्याची संधी अनेकांना मिळत आहे. दुर्ग भटकंतीची आवड आहे. परंतु, एकट्याने जाण्याची हिंमत हो नाही. अशांचा वैनतेय हा एक आधार झाला आहे. सह्याद्रीत वर्षभर डोंगरयात्रा घडविणे, गिर्यारोहण मोहिमांचे आयोजन करणे, निसर्ग ओळख यात्रा, हिमालयीन पदभ्रमण मोहिमा आयोजन करण्यात येतात. संस्थेचे इतिहास संशोधनात योगदान आहे.

अलीकडेच १२ शिवदुर्गांना जागतिक वारसा स्थळ नामांकन मिळून जागतिक समूदायाची मान्यता मिळाली. त्यात नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळावी, याकरिता संस्थेने मोलाचे योगदान दिले. साल्हेरचा जोडदुर्ग आणि साल्हेरबरोबरच प्रसिध्द अशा सालोटा किल्ल्यावरील हरवलेली दुसरी प्राचीन वाट संस्थेने शोधून काढली.

संस्थेचे गिर्यारोहक प्रशांत परदेशी यांच्या नेतृत्वाखाली राहुल सोनवणे, गौरव जाधव, चेतन खर्डे, पृथ्वीराज शिंदे, देवसेना आहिरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे आणि भाऊदास पवार यांच्या पथकाने ही शोध मोहीम यशस्वी केली. महाराष्ट्र शासनाने त्यानंतर तत्काळ सालोटा किल्ला राज्य संरक्षित गड म्हणून घोषित केला. संस्थेच्या गिर्यारोहकांनी आजपर्यंत १८ किल्ले शोधून त्यांचे संशोधन केले आहे. संबंधित किल्ल्यांचा इतिहास सर्वांसमोर आणण्याचे काम केले आहे. संस्थेच्या वतिने इतिहासविषयक व्याख्यानांचे आयोजन केले जाते. संस्थेचे प्रशिक्षित डोंगर बचाव दल असून नाशिक परिसरात डोंगर बचावाच्या मोहिमा पंचवीस वर्षापासून सातत्याने करण्यात येत आहेत.

वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेची वाटचाल आता ४० व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त आयोजित डोंगर भटक्यांच्या सोहळ्यास डोंगर प्रेमींनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे विश्वस्त व कार्यकारी मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

नाशिक येथील वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्ताने १० सप्टेंबर रोजी इंडियन माउंटन फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशनचा हा सहावा आयएमएफ लघुपट महोत्सव असून भारतातील प्रमुख शहरात त्याचे आयोजन केले जात आहे. यात भारतातील गिर्यारोहण, धावणे, सायकलिंग अशा साहसी खेळावरील पुरस्कारप्राप्त लघुपट दाखवले जाणार आहेत..