जळगाव – बोगस कॉल सेंटर चालवून विदेशी नागरिकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिंदे गटाचे माजी महापौर ललित कोल्हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, कोल्हे यांना खास वागणूक देण्यासह बोगस कॉल सेंटरकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या निरीक्षकाची उचलबांगडी आता करण्यात आली आहे.
पोलिसांनी माजी महापौर कोल्हे आणि इतर संशयितांच्या विरोधात संघटित गुन्हेगारीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांर्तगत गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, सर्व संशयितांना न्यायालयात हजर केल्यावर यापूर्वी चार तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आधीच्या कोठडीची मुदत संपल्यावर संशयितांना शनिवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
तपास अधिकारी नितीन गणापुरे यांनी गुन्ह्यातील अन्य मुख्य संशयितांचा शोध घेण्यासाठी त्यांना वाढीव पोलीस कोठडी सुनावण्याची मागणी केली. त्यानुसार, न्यायालयाने आठ तारखेपर्यंत कोल्हे यांच्यासह इतरांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. कोल्हे यांच्या विरोधात याआधी दाखल गुन्ह्यांची संख्या बरीच मोठी आहे. त्यात आता पुन्हा संघटित गुन्हेगारीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांर्तगत दाखल गुन्ह्याची भर पडली आहे.
अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना माजी महापौर कोल्हे यांच्या ममुराबाद रस्त्यावरील फार्म हाऊसवर बोगस कॉल सेंटर चालविले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारे नखाते यांनी २८ सप्टेंबरला एल. के. फार्म हाऊसवर छापा टाकून कोल्हे यांच्यासह आठ संशयितांना ताब्यात घेतले होते.
दरम्यान, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय गायकवाड यांनी बोगस कॉल सेंटर प्रकरणी अटकेत असलेले संशयित माजी महापौर कोल्हे यांना खास वागणूक दिली. तसेच कार्यक्षेत्रात इतके दिवस कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर कॉल सेंटर चालविले जात असल्याकडे काणाडोळा केला, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी रात्री निरीक्षक गायकवाड यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्याचे आदेश सुद्धा काढले.
तालुका पोलीस ठाण्याचा तात्पुरता पदभार आता सहाय्यक निरीक्षक अनंत अहिरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. वाळू माफियांसह अवैध धंदे चालविणाऱ्यांना नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या तालुका पोलीस ठाण्याचा कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आल्याने नागरिकांनीही सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे. माजी महापौर ललित कोल्हे हे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे कोठडीत असताना कोल्हे यांना खास वागणूक देण्यात यावी म्हणून तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय गायकवाड यांच्यावर राजकीय दबाव आणला गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये तशी चर्चा ऐकण्यास मिळत आहे.