नाशिक : जिल्ह्यातील विविध बँकामध्ये वैयक्तिक, संस्थात्मक आणि सरकारी योजनांच्या खात्यांमध्ये ग्राहकांनी गुंतवणूक केली. परंतु, गुंतवणुकीचा परतावा न घेतल्याने या बँकामधील सुमारे १४२ कोटी रुपयांच्या ठेवी शिल्लक आहेत. या ठेवींचा एकूण तीन लाख ६९ हजार ९९८ खातेदारांना परतावा मिळवून देण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सर्व बँकांकडून जनजागृती शिबिरे व ग्राहक भेटींचे आयोजन करण्यात आले आहे. खातेदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक भिवा लवटे यांनी केले आहे.
जिल्ह्यात बँकाचे जाळे पसरले आहे. बँकाच्या वतीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ठेवींवर व्याजदर, गुंतवणुकीचे विविध पर्याय दिले जातात. परंतु, काही ग्राहकांनी अद्याप ठेवींवर दावा न सांगितल्याने जिल्ह्यातील काही बँकामध्ये १४२ कोटीच्या ठेवी पडून आहेत. या ठेवी संबंधित ग्राहकांना मिळाव्यात यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम ३१ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येत आहे. जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने आणि सर्व सदस्य बँकांच्या सहकार्यातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. देशभरात सुमारे रुपये एक लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी विविध बँकांमध्ये शिल्लक आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात रुपये पाच हजार ८६६ कोटी असून त्यात वैयक्तिक खात्यांच्या रुपये चार हजार ६१२ कोटी, संस्थांच्या रुपये एक हजार ८२ कोटी आणि सरकारी योजनांतील रुपये १७२ कोटी रूपयांच्या ठेवी समाविष्ट आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, १० वर्षापासून निष्क्रिय असलेल्या खात्यांतील ठेवी शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये हस्तांतरित केल्या जातात, तथापि, खातेदारांना आपले पैसे परत मिळविण्याचा पूर्ण हक्क आहे. ठेवी परत मिळविण्यासाठी संबंधित खातेदारांनी आपल्या बँकेत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे व अद्ययावत केवायसी सादर करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यतील बँकामधील दावा न केलेल्या ठेवी पुढीलप्रमाणे- स्टेट बँक ऑफ इंडिया (खातेदार संख्या- एक लाख तीन हजार ४९५) ठेव – रुपये ४७.३४ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र- खातेदार संख्या
पाच हजार ५७५ – ठेव रक्कम रूपये २६.६० कोटी
बँक ऑफ इंडिया- खातेदार संख्या ५६,५३३ – ठेव रक्कम रूपये १३.२० कोटी
युनियन बँक ऑफ इंडिया- खातेदार संख्या ३२,४८१ – ठेव रक्कम रूपये ११.८६ कोटी
कॅनरा बँक – खातेदार संख्या ३३,५३५ – ठेव रक्कम रूपये ७.८० कोटी
बँक ऑफ बरोडा – खातेदार संख्या २५४५३ – ठेव रक्कम रूपये ७.५० कोटी
पंजाब नॅशनल बँक- खातेदार संख्या १,४४६ – ठेव रक्कम रूपये ४.९६ कोटी
आयसीआयसीआय बँक- खातेदार संख्या १५८८९ ठेव रक्कम रूपये ४.५१ कोटी
सेंट्रल बँक ऑफ इंडिया- खातेदार संख्या १४,२७६- ठेव रक्कम रूपये ४.१७ कोटी
आयडीबीआय- खातेदार संख्या १४,२१९ – ठेव रक्कम रूपये ३.८७ कोटी
एक्सिस बँक (AXIS Bank) – खातेदार संख्या १०,६३६, ठेव रक्कम रूपये- ३.६१ कोटी
एचडीएफसी – खातेदार संख्या ५३४६- ठेव रक्कम रूपये १.४९ कोटी
इंडियन ओव्हरसीज बँक – खातेदार संख्या ५८९८- ठेव रक्कम रूपये १.३९कोटी
यूको बँक – खातेदार संख्या ६,२३३ – ठेव रक्कम रूपये १.३९ कोटी
