जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) दोन माजी महापौर, विरोधी पक्ष नेता आणि १० ते १२ माजी नगरसेवकांनी शुक्रवारी भाजपमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी भाजपतर्फे जळगाव शहरात मोठे शक्ती प्रदर्शनही करण्यात आले.

जळगाव महापालिकेच्या २०१८ मधील निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे मैदानात उतरून एकमेकांच्या विरोधात लढत दिली होती. त्या वेळी भाजपने सर्वाधिक जागा जिंकत महापालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले असले, तरी नंतरच्या काळात शिवसेनेने भाजपचे काही नगरसेवक आपल्या बाजूला ओढून सत्तेचा पलडा आपल्या दिशेने झुकवत महापालिकेची सत्ता मिळवली होती. ज्यामुळे भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि आमदार सुरेश भोळे यांना मोठा धक्का बसला होता. या संपूर्ण घडामोडीत ठाकरे गटाचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांची भूमिका निर्णायक ठरली होती. भाजपचे नगरसेवक सोबत आल्यानंतर त्यांच्या सौभाग्यवती जयश्री महाजन यांची जळगावच्या महापौरपदी निवड झाली होती. पुढे विधानसभेच्या निवडणुकीतही महाजन परिवाराने भाजपसाठी मोठे आव्हान निर्माण केले होते.

ठाकरे गटाने भाजपचे काही नगरसेवक फोडून महापालिकेची सत्ता काबीज केली होती, त्याचाच हिशेब चुकता करण्याचा निर्धार भाजपने आता केला आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपने सध्या ठाकरे गटात असलेल्या आणि माजी मंत्री सुरेश जैन यांचे समर्थक मानल्या जाणाऱ्या दोन माजी महापौरांसह बऱ्याच नगरसेवकांना आपल्या गोटात आणण्यासाठी पाऊले उचलली. त्यानुसार, एकेकाळी भाजपसाठी डोकेदुखी बनलेले सुनील महाजन, जयश्री महाजन तसेच ठाकरे गटाचे माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी नगरसेवक प्रशांत नाईक, नितीन बरडे, वर्षा खडके, हर्षा सांगोरे, संगिता दांडेकर, चेतन शिरसाळे, जितेंद्र मुंदडा, जाकीर पठाण, शबाना खाटीक, नितीन सपके, इकबाल पिरजादे आदींनी भाजपमध्ये शुक्रवारी प्रवेश केला. भाजपची खेळी यशस्वी ठरल्याने ठाकरे गट आणखी खिळखिळा झाला.

संबंधित सर्व तोलामोलाच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांना आपल्या बाजूला करण्यासाठी भाजपला ज्येष्ठ नेते सुरेश जैन यांचीही मनधरणी करावी लागली. भाजपचे ते प्रयत्न यशस्वी ठरल्याने ठाकरे गटासाठी तो मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. यावेळी भाजपचे आमदार सुरेश भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, माजी महापौर भारती सोनवणे, कैलास सोनवणे, जितेंद्र मराठे, अरविंद देशमुख आदी उपस्थित होते. ठाकरे गटाचे दोन माजी महापौर, विरोधी पक्ष नेता आणि डझनभर माजी नगरसेवकांच्या प्रवेशा वेळी भाजपतर्फे जळगाव शहरात मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आणण्याचा निर्धार केला गेला.