जळगाव : पश्चिम रेल्वेच्या जळगाव -उधना मार्गावरील अमळनेर स्थानकालगतचा मालधक्का प्रवाशांसाठी खूपच त्रासदायक ठरत आहे. त्याठिकाणी सिमेंटच्या गोण्यांची मोठ्या प्रमाणात चढ- उतार केली जात असल्याने, दिवसभर धुळीचे प्रचंड लोट उठतात. मालधक्का स्थानकापासून दूर कुठेतरी स्थलांतरीत करण्यासाठी खासदार स्मिता वाघ यांनी यापूर्वीच पाठपुरावा केला असला, तरी रेल्वे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागांतर्गत ताप्ती ‎सेक्शनमध्ये समाविष्ट असलेल्या जळगाव ते उधना लोहमार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण झाल्यापासून लांब पल्ल्याच्या प्रवासी रेल्वे गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धरणगावसह अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा आणि नंदुरबार ही काही महत्वाची स्थानके या मार्गावर आहेत. त्यापैकी अमळनेर रेल्वे स्थानकावर आठवडाभरात सरासरी सुमारे ६४ प्रवासी गाड्या दोन्ही बाजुंनी थांबतात. आणि दररोज सुमारे चार ते साडेचार हजार प्रवाशांची चढ- उतार होते. प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने या स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश करून नवीन विकास आराखडा मंजूर केला आहे. ज्या माध्यमातून विस्तारीत फलाट, नवीन प्रशासकीय इमारत, प्रशस्त तिकीट घर, अतिरिक्त प्रवेशद्वार आणि प्रवाशांच्या सोयीसाठी उदवाहक आदी बऱ्याच कामांना चालना देण्यात आली आहे.

यापूर्वी, अमळनेरमार्गे धावणाऱ्या अप आणि डाऊन मार्गावरील सर्व प्रकारच्या प्रवासी गाड्या एकाच फलाटावर थांबायच्या. परिणामी, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचा विनाकारण खोळंबा होत असे. सर्व गाड्या एकाच फलाटावर थांबत असताना, सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची अलोट गर्दी स्थानकावर दिसून येत असे. अखेर रेल्वे प्रशासनाने अमळनेर स्थानकावर सुरत- भुसावळ डाऊन मार्गावर माल धक्क्यालगत दुसऱ्या फलाटाचे काम हाती घेतले.

२०१६ मध्ये कार्यान्वित झालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या फलाटामुळे प्रवाशांची गर्दी विभागली गेली. परंतु, लगतच्या धक्क्यावर खाली होणाऱ्या सिमेंटच्या मालवाहू गाड्यांमुळे उडणाऱ्या धुळीचा मोठा त्रास प्रवाशांच्या वाट्याला आला. जो आजतागायत कायम आहे. नवीन फलाट कार्यान्वित झाला. त्यावेळीच तत्कालिन खासदारांसह आमदारांनी मालधक्का अन्यत्र स्थलांतरीत करण्याची मागणी केली नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनानेही त्या विषयाला फार महत्व दिले नाही. आता देखील वेगळी परिस्थिती नसल्याने प्रवाशांना हाल सहन करावे लागत आहेत.

अमळनेर रेल्वे स्थानकावरील मालधक्का प्रवाशांसाठी खूपच त्रासदायक ठरत असतो. तो अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्याची मागणी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह विभागीय व्यवस्थापकांच्या बैठकीत यापूर्वीच केली आहे.

स्मिता वाघ (खासदार, जळगाव)