जळगाव – जिल्ह्यात सप्टेंबरमधील परतीच्या पावसाने तडाखा दिल्यानंतर नद्यांसह नाल्यांना मोठे पूर आल्याने सुपीक शेती खरडून गेली. सुमारे दीड लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. मात्र, या पावसाने विहिरींच्या पाणी पातळीत अचानक मोठी वाढ झाल्याने नव्या उमेदीने पुन्हा कामाला लागलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबरच्या कालावधीत सरासरी ७०७.१ मिलीमीटर पाऊस पडतो. प्रत्यक्षात, यंदा चार महिन्यांच्या कालावधीत ६९२.७ मिलीमीटर (९८ टक्के) पावसाची नोंद घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच दिवसापर्यंत सुमारे १११ टक्के पाऊस पडला होता. त्या तुलनेत यंदा थोडा कमी पाऊस पडला असला, तरी सप्टेंबरमधील एकूण सरासरी २६०.७ मिलीमीटर पावसाने सगळीकडे दाणादाण उडवून दिली.
वाघूर, गिरणा, हतनूर तसेच अन्य बरेच मध्यम प्रकल्प तुडूंब भरल्याने पाटबंधारे विभागाला मोठ्या संख्येने दरवाजे उघडून विसर्ग वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे सर्व नद्या काही दिवसांपासून दुथडी भरून वाहत आहेत. शेती शिवारातून वाहणारे नाले सुद्धा खळाळत आहेत. यामुळे भूजल पातळी वाढण्यासही चांगली चालना मिळाल्याचे चित्र सगळीकडे दिसून येत आहे.
रब्बी पिकांच्या सिंचनाची सोय
परतीच्या पावसाने खरीप हंगामाचे अतोनात नुकसान झाले आहे. सुदैवाने भूजल पातळीत चांगली वाढ झाल्याने शेतकऱ्यांना विहिरींमधील पाणी साठ्यावर पुढील रब्बी हंगामात गहू, दादर, हरभरा, मका तसेच कांदा, भाजीपाला आदी बरीच पिके घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे खरिपाचे नुकसान भरून निघणार नसले, तरी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळू शकेल. याशिवाय, जनावरांना लागणाऱ्या हिरव्या चाऱ्याचे पीक घेता येईल.
पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली
परतीच्या पावसानंतर भूजल पातळी वाढून विहिरी तुडूंब भरल्याने शेती सिंचनासह आता पिण्याच्या पाण्याची चिंता सुद्धा मिटली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात अनेक गावांना पावसाळा सुरू झाला तरी टँकरने पाणी पुरवठा करावा लागला होता. प्रशासनाच्या मते यंदा टंचाईला तोंड देण्याची वेळ सहसा येणार नाही. कारण, शेती शिवारातील आणि गावठाणमधील विहिरी ओसंडून वाहत आहेत. पाटबंधारे विभागाने धरणांसह बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविल्याने पुढील काळात कदाचित पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार नाही.
६० फूट खोल विहिरीत ऑगस्ट महिन्यापर्यंत निम्मेच पाणी होते. मात्र, सप्टेंबरमधील परतीच्या पावसानंतर आता विहीर तुडूंब भरली असून, हाताने पाणी काढून घेण्यासारखी स्थिती आहे. या पाण्यावर रब्बी पिके घेण्याचे नियोजन आहे. -आनंदा पाटील (शेतकरी- प्रिंप्री बुद्रुक, ता. पाचोरा, जि. जळगाव)